पिंपरी (Pclive7.com):- महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी बनावट चावीचा वापर करून घरफोडी करणाऱ्या एका महिलेला अवघ्या २४ तासांत अटक करत कौतुकास्पद कामगिरी केली आहे. आरोपीकडून सुमारे १३ लाख ८७ हजार रुपये किमतीचे १० तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, भरदिवसा घरफोडीची घटना घडली होती. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपआयुक्त श्वेता खेडकर व सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन कदम यांनी तत्काळ तपासाचे आदेश दिले.

तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. त्यामध्ये एका महिलेचा संशयास्पद वावर आढळून आला. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी सारिका संतोष भुजबळ हिला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपी महिला ही फिर्यादीच्या ओळखीची असल्याचे समोर आले. घरातील दागिन्यांची माहिती असल्याने तिने घराच्या दरवाजाची बनावट चावी तयार करून घेतली होती. संधी साधून घरात प्रवेश करून कपाटातील दागिने चोरल्याची कबुली तिने दिली.

पोलिसांनी आरोपीकडून चोरीस गेलेले सर्व दागिने हस्तगत केले असून या प्रकरणाचा जलदगतीने छडा लावल्याबद्दल नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक करण्यात येत आहे.




















Join Our Whatsapp Group