पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेचा निकाल जाहीर झाल्यानंतर थेरगाव परिसरात खळबळजनक घटना घडली आहे. मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने एका कारवर ज्वलनशील द्रव टाकून आग लावल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली आहे.

ही कार शिवसेना (एकनाथ शिंदे गट) च्या पराभूत उमेदवाराच्या चुलत भावाची असून आकाश बारणे असे त्यांचे नाव आहे. प्रभाग क्रमांक 23, थेरगाव येथे ही घटना घडली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका व्यक्तीने बाटलीतील ज्वलनशील द्रव कारवर फेकून आग लावताना स्पष्टपणे दिसत आहे.

आकाश बारणे यांनी भाजपच्या एका कार्यकर्त्यानेच ही कार पेटवून दिल्याचा आरोप केला असून यासंदर्भात त्यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र, घटना सीसीटीव्हीत स्पष्टपणे दिसत असतानाही पोलिसांकडून अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. या प्रकारामुळे पिंपरी-चिंचवड पोलीस प्रशासन गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ का करत आहे? असा सवाल उपस्थित केला जात आहे. या प्रकरणावर पुढील तपास आणि पोलिसांची भूमिका काय राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
























Join Our Whatsapp Group