पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेची स्थायी समितीची बैठक बुधवारी (दि. २५) आयोजित करण्यात आली होती. त्यापूर्वी सभापतीच्या कार्यालयात झालेल्या पूर्व बैठकीमध्ये शिवसेनेच्या नगरसेविका आणि भाजपच्या नगरसेविकेचे पती यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडली. दोघेही एकाच प्रभागातील असून नगरसेविका सुलभा उबाळे या जलतरण तलाव चालू करण्यासाठी निविदेला मंजुरी द्या असे म्हणत होते. तर नगरसेविका अर्चना कारंडे यांचे पती अक्षय कारंडे यांनी याला विरोध केल्याने बाचाबाची झाली.

यमुनानगर या ठिकाणी के. माँसाहेब सौ. मिनाताई ठाकरे जलतरण तलाव आहे. हा तलाव भाडेतत्वावर चालविण्यासाठी क्रीडा विभागाच्या वतीने निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. त्यामध्ये मे. ए. के. ग्रुप ग्रिफिन्स, डिविजनल स्पोर्टस कॉम्प्लेक्स यांची निविदा पात्र ठरली असून त्यांना काम देण्यासाठी विषय स्थायी समितीमध्ये ठेवण्यात आला होता. दरम्यान, पूर्व बैठकीमध्ये अक्षय कारंडे यांनी हा विषय मंजूर करू नका असे सांगितले. त्यावर सुलभा उबाळे यांनी उन्हाळा वाढला असून जलतरण तलावाची मागणी असून हा विषय मंजूर केला पाहिजे असे सांगितले. यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली.

सुलभा उबाळे यांनी ही स्थायी समितीची पूर्व बैठक असून याठिकाणी फक्त सदस्यांनाच येण्यास परवानगी असल्याचे सुनावले. तर त्यावर ही महापालिका असून याठिकाणी येण्यापासून आम्हाला कोणी रोखू शकत नाही, आम्ही काय कोणाच्या घरात येत नाही असे सांगितले. त्यामुळे दोघांमध्ये बाचाबाची झाली. अखेर सभापती व इतर सदस्यांनी अक्षय कारंडे यांना बाहेर जाण्यास सांगितले. त्यानंतर हा वाद निवळला. मात्र, स्थायी समितीच्या सभेमध्ये हा विषय तहकूब करण्यात आला.
मात्र, या सर्व प्रकरणामध्ये महिला लोकप्रतिनिधींच्या जागी त्यांच्या पतींचाच सहभाग असल्याचे समोर आले आहे. कोणत्याही अधिकृत पदावर नसलेल्या व्यक्तीकडून थेट निविदा प्रक्रियेवर भूमिका मांडल्याने नेमके निर्णय कोण घेत आहे हा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधी बाजूला आणि त्यांच्या कुटुंबियांचाच वाढता हस्तक्षेप यामुळे स्थायी समितीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.



















Join Our Whatsapp Group