पिंपरी (Pclive7.com):- रावेत पोलिसांनी चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांचा छडा लावत एका सराईत आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून पाच चेन स्नॅचिंग आणि एका मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. या कारवाईत सुमारे २ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

रावेत पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या चेन स्नॅचिंग प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. तपास पथकाने सापळा रचून आदित्य परशुराम मनलोर (वय १९, रा. पाटील इस्टेट गल्ली नंबर १०, शिवाजीनगर, पुणे) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने विविध भागांत चेन स्नॅचिंग व दुचाकी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी आरोपीकडून सोन्याचे दागिने तसेच चोरीस वापरण्यात आलेली KA-38 EA 8929 क्रमांकाची मोटारसायकल जप्त केली. आरोपीविरुद्ध रावेत, हिंजवडी, तळेगाव दाभाडे, विश्रांतवाडी आणि बिदर (कर्नाटक) परिसरातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे. या कारवाईत एकूण १ लाख ६५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि १ लाख रुपयांची मोटारसायकल असा एकूण २ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक संदिप देशमुख, पोलीस उप-निरीक्षक राहुल खिळे, सहा पोलीस फौजदार संतोष कोळगे, पोलीस हवालदार आशिष बोटके, गोवींद चव्हाण, पोलीस शिपाई विनायक मराठे, प्रदीप गायकवाड, अजित बेंडभर, सौदागर लामतुरे, विनोद कदम, निखील कपले यांनी केली आहे.




















Join Our Whatsapp Group