पिंपरी (Pclive7.com):- ठाकरे गटाच्या शिवसेनेतील ६ खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केला असून ते लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करतील, असा मोठा दावा शिंदे गटाचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केला आहे. या घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

खासदार श्रीरंग बारणे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, ही घटना अचानक घडलेली नसून गेल्या वर्षभरापासून संबंधित खासदारांमध्ये नाराजीची भावना होती. त्यांनी अनेकदा आपली खदखद व्यक्त केली होती. याबाबत उद्धव ठाकरे आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांनाही पूर्ण कल्पना होती. मात्र, नेमके कोणत्या दिवशी निर्णय घ्यायचा यावर चर्चा सुरू होती. अखेर त्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत.

श्रीरंग बारणे म्हणाले की, तथाकथित ‘ऑपरेशन टायगर’च्या राजकीय घडामोडी सुरू असताना ते स्वतः दिल्लीत उपस्थित होते आणि संपूर्ण प्रक्रियेचे साक्षीदार होते. येत्या दोन ते तीन दिवसांत संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. तसेच स्वतंत्र गट स्थापन करणारे ६ खासदार कोण आहेत, याचीही माहिती समोर येईल, असा दावा त्यांनी केला.

दरम्यान, श्रीरंग बारणे यांच्या या वक्तव्यामुळे ठाकरे गटात खळबळ उडाली असून राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. संबंधित खासदारांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, पुढील काही दिवसांत या राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




















Join Our Whatsapp Group