पिंपरी (Pclive7.com):- प्रसिद्ध टाटा सॉल्ट कंपनीच्या नावाने बनावट मीठ विक्रीसाठी ठेवल्याप्रकरणी मोशी येथील एका व्यावसायिकाविरोधात भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून आरोपी अद्याप फरार आहे.

याप्रकरणी कृष्णा देवीप्रसाद कनोजिया (वय ५०, रा. मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार गोपाल प्रभुरामजी प्रजापत (वय २८, रा. आदर्शनगर, मोशी) याच्याविरोधात कॉपीराइट कायदा कलम ५१ व ६३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास मोशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील तुळशी ट्रेडिंग या दुकानात ही कारवाई करण्यात आली. तपासादरम्यान आरोपीने टाटा सॉल्ट कंपनीच्या नावाने बनावट मीठ विक्रीसाठी ठेवले असल्याचे आढळून आले.

सदर बनावट उत्पादनाचा वापर केल्यास ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. कंपनीच्या स्वामित्व हक्कांचे उल्लंघन करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हा प्रकार केल्याचा आरोप आहे. भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.




















Join Our Whatsapp Group