पिंपरी (Pclive7.com):- आर्थिक विवंचनेला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या पिंपरीतील एका कुटुंबातील पत्नी व मुलीचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. काल पतीचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या दुर्दैवी घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पिंपरी येथील करिष्मा ग्लोरी सोसायटीमध्ये राहणारे विनोद पिल्ले (वय ५०), त्यांची पत्नी सिरजा पिल्ले (वय ४५) आणि मुलगी पूर्णिमा पिल्ले (वय १९) यांनी विषारी रसायनाचा धूर घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या घटनेत विनोद पिल्ले यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. तर वायसीएम रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना सिरजा पिल्ले आणि पूर्णिमा पिल्ले यांचाही मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे कुटुंब अत्यंत उच्चशिक्षित होते. विनोद पिल्ले यांनी आयआयएम अहमदाबादमधून संगणकशास्त्राचे शिक्षण घेतले होते, तर सिरजा पिल्ले या एका नामांकित शाळेत समन्वयक म्हणून कार्यरत होत्या. कामावर गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांनी नातेवाईकांशी संपर्क साधला. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
घटनास्थळी संत तुकाराम नगर पोलिसांना सुसाईड नोट आणि सोडियम नायट्रेट या विषारी रसायनाचा डबा आढळून आला. सुसाईड नोटमध्ये आर्थिक अडचणींमुळे हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे नमूद करण्यात आले असून या घटनेसाठी कोणालाही जबाबदार धरू नये, असे लिहिले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

प्राथमिक तपासात विनोद पिल्ले यांनी ऑनलाइन मागवलेले सोडियम नायट्रेट कोळशावर जाळून त्याचा धूर पसरविल्याचे समोर आले आहे. मोठ्या आर्थिक संकटामुळे या कुटुंबाने तीन वर्षांपूर्वी नेहरूनगर येथील स्वतःचे घर विकले होते. सध्या ते मोरवाडी परिसरात भाड्याच्या घरात राहत होते. या हृदयद्रावक घटनेचा संत तुकाराम नगर पोलीस अधिक तपास करत आहेत.




















Join Our Whatsapp Group