पिंपरी (Pclive7.com):- दुधात भेसळ करणे हा अक्षम्य गुन्हा असून केवळ आर्थिक फायद्यासाठी पुढच्या पिढ्यांना कर्करोग व इतर गंभीर आजार देणारी दूध भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज संसदेत केली. मंचर येथे उघडकीस आलेल्या आंतरराज्यीय दूध भेसळ रॅकेटच्या संदर्भात सदनाचे लक्ष वेधताना भेसळखोरांना कुणाचाही सामाजिक वा राजकीय वरदहस्त असला तरी त्याची गय केली जाऊ नये अशी मागणीही त्यांनी केली.

या संदर्भात खासदार डॉ. कोल्हे यांनी नियम ३७७ अंतर्गत तातडीच्या सार्वजनिक विषयांवर निवेदन करताना काही दिवसांपूर्वी पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाने संयुक्त कारवाई करुन पुणे जिल्ह्यातील मंचर येथील दूध भेसळ करणाऱ्या १३ जणांना अटक केली. या कारवाईत सुमारे ३ कोटी रुपयांचे भेसळयुक्त दूध, रसायने व इतर साहित्य जप्त केले, याचा उल्लेख करीत अनेक जिल्ह्यांमध्ये भेसळयुक्त दुधाचा पुरवठा करणारे सुनियोजित जाळे कार्यरत असून त्यामुळे सार्वजनिक आरोग्यास विशेषतः लहान मुले, गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्ण यांना गंभीर धोका निर्माण झाला असल्याचे सांगितले.

खासदार डॉ. कोल्हे पुढे म्हणाले की, दुधामध्ये युरिया, डिटर्जंट, स्टार्च आणि घातक रासायनिक पदार्थांची भेसळ केल्याने अन्न विषबाधा, मूत्रपिंडाचे विकार तसेच इतर गंभीर दीर्घकालीन आजार उद्भवू शकतात. त्याचबरोबर अशा बेकायदेशीर प्रकारांमुळे ग्राहकांचा विश्वास डळमळीत होतो. परिणामी प्रामाणिक दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होते. तसेच भारतीय दुग्ध उद्योगाच्या प्रतिमेलाही धक्का पोहोचतो. त्यामुळे केंद्र सरकारकडे या प्रकरणाचा जलदगतीने तपास करून अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम, २००६ अंतर्गत दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी खासदार डॉ. कोल्हे यांनी केली.

त्याचबरोबर सर्व दूध संकलन केंद्रांवर सक्तीची गुणवत्तेची तपासणी, दूध वाहतूक करणाऱ्या टँकरसाठी जीपीएस-आधारित छेडछाड-प्रतिरोधक सील व्यवस्था, शेतकऱ्यांपासून प्रक्रिया केंद्रापर्यंत क्यूआर कोड-आधारित मागोवा (Traceability), फिरत्या प्रयोगशाळांद्वारे नियमित तपासण्या आणि माहिती देणाऱ्यांना प्रोत्साहन देणारी देशव्यापी तक्रार नोंदणी यंत्रणा सुरू करण्यात यावी, अशी मागणी करताना, दूध भेसळ हा सार्वजनिक आरोग्यावरील गंभीर गुन्हा मानून देशातील प्रत्येक कुटुंबाला सुरक्षित व शुद्ध दूध उपलब्ध होईल, यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात, असे खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितले.




















Join Our Whatsapp Group