पिंपरी (Pclive7.com):- तरुणीचे अश्लील व्हिडिओ तयार करून ते इन्स्टाग्रामवर प्रसारित करत तिचे लैंगिक आणि मानसिक शोषण करणाऱ्या एकाला पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने ६ महिन्यांची सक्तमजुरी आणि दंड ठोठावला आहे.

प्रभाकर ऊर्फ लकी जमिनीकांत परिडा (वय २५, रा. अर्चना पॅराडाईज, लेबर कॅम्प, महम्मदवाडी, पुणे) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी बिभुप्रसाद परिंडा याने पीडित मुलीचे अश्लील व्हिडिओ तयार केले होते. हे व्हिडिओ त्याने आरोपी प्रभाकर (लकी) याला पाठवले. त्यानंतर प्रभाकरने ते व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल करून पीडितेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याप्रकरणी सुरुवातीला पौड पोलीस ठाण्यात (पुणे ग्रामीण) गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हा गुन्हा तपासासाठी बावधन पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला. तपासादरम्यान आरोपींनी पीडितेचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले. पोलीस निरीक्षक (गुन्हे) भास्कर कदम यांनी तातडीने आरोपींचा शोध घेऊन त्यांच्याविरोधात भक्कम पुरावे गोळा केले आणि न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. पुण्यातील शिवाजीनगर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. यु. वडगावकर यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. न्यायालयाने सबळ पुरावे ग्राह्य धरून आरोपी प्रभाकर परिडा याला ६ महिने सक्तमजुरी २०० रुपये दंड (दंड न भरल्यास अतिरिक्त ३ दिवस सक्तमजुरी) अशी शिक्षा सुनावली.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त प्रदीप जाधव वरिष्ठ निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तात्कालीन निरीक्षक भास्कर कदम यांनी या गुन्ह्याचा सखोल तपास केला. तर सरकारी अभियोक्ता म्हणून अरुंधती ब्रम्हे, कोर्ट पैरवी अधिकारी अशोक सकुंडे, सेशन कोर्ट अंमलदार पाखरे आणि शिंदे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.




















Join Our Whatsapp Group