पिंपरी (Pclive7.com):- लोकशाहीर, साहित्यरत्न डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि आमदार अमित गोरखे युथ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवड येथील बर्ड व्हॅली उद्यान चौकात अत्यंत दणक्यात, उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात ‘साहित्यरत्न दौड २०२६’ पार पडली. उल्लेखनीय म्हणजे साहित्यरत्न दौडमध्ये नागरिक, युवक आणि क्रीडाप्रेमींनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला असून २२०० हून अधिक धावपटूंनी सहभाग नोंदवला. याप्रसंगी मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आमदार अमित गोरखे साहेब यांचे विशेष अभिनंदन केले.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ‘साहित्यरत्न, लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे पिंपरी-चिंचवड प्रबोधन पर्व २०२६’ या साप्ताहिकाअंतर्गत हा भव्य उपक्रम राबवण्यात आला. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, आमदार अमित गोरखे युथ फाऊंडेशन, आर्टी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ आणि कलारंग यांच्या संयुक्त सहकार्याने या आगळ्यावेगळ्या दौडचे आयोजन करण्यात आले होते. आमदार अमित गोरखे यांच्या कुशल नेतृत्वाखाली पार पडलेल्या या दौडमध्ये अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत… तसेच पिंपरी-चिंचवडसह विविध शहरांतून आलेल्या हजारो नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. नागरिकांच्या अफाट उपस्थितीने बर्ड व्हॅली उद्यान परिसर अक्षरशः दुमदुमून गेला होता.

‘साहित्यरत्न दौड – रन फॉर हेल्थ’
यावेळी मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आमदार अमित गोरखे साहेब यांचे विशेष अभिनंदन केले. तसेच आमदार गोरखे अत्यंत नाविन्यपूर्ण संकल्पनेतून, लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्यांदाच ‘साहित्यरत्न दौड’ चे आयोजन केल्याचे त्यांनी म्हटले. सहसा महापुरुषांच्या जयंतीनिमित्त आपण बोधपर्व किंवा विविध मिरवणुका काढतो. परंतु, शहर सुदृढ राहावे आणि नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे, या उदात्त उद्देशाने आमदार साहेबांनी ही ‘साहित्यरत्न दौड – रन फॉर हेल्थ’ सुरू केली; ही खरोखरच एक अतिशय स्तुत्य आहे. त्याबद्दल आमदार अमित गोरखे साहेबांचे मी विशेष अभिनंदन करतो. आजच्या या ‘रन फॉर हेल्थ’ उपक्रमात २,२०० हून अधिक नागरिकांनी अतिशय चांगल्या क्रीडा भावनेने (Spirit) उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे. या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या सर्व नागरिकांचे मी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि शासनाच्या विविध उपक्रमांच्या सहकार्याने हा कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पडला आहे. या कार्यक्रमाला सहाय्य केल्याबद्दल पोलीस प्रशासन, महानगरपालिकेचे कर्मचारी आणि सर्व सहकाऱ्यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. महाराष्ट्रात प्रथमच राबवलेल्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा, या शब्दांत डॉ. सूर्यवंशी यांनी भावना व्यक्त केल्या.
“लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार हे केवळ एका पिढीपुरते मर्यादित नसून ते संपूर्ण बहुजन समाजासाठी आणि युवाशक्तीसाठी सदैव मार्गदर्शक आहेत. आजच्या या ‘साहित्यरत्न दौड २०२६’ मध्ये पिंपरी-चिंचवडच्या लाडक्या नागरिकांनी आणि युवकांनी ज्या अभूतपूर्व उत्साहात सहभाग घेतला, त्यावरून हे स्पष्ट होते की अण्णा भाऊंचे विचार आजही प्रत्येकाच्या मनात आणि रक्तात रुजलेले आहेत. युवकांना सकारात्मक ऊर्जा, उत्तम आरोग्य आणि सामाजिक समरसतेचा संदेश देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला असून, यापुढेही अशाच प्रेरणादायी उपक्रमांच्या माध्यमातून आपण अण्णाभाऊंचा वैचारिक वारसा पुढे नेत राहू.”
– आमदार अमित गोरखे
प्रमुख उपस्थिती..
आमदार शंकर जगताप, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी, उपमहापौर शर्मिला बाबर, भाजपा शहर अध्यक्ष शत्रुघन बापू काटे, उमेश चांदगुडे, विरोधी पक्षनेता भाऊसाहेब भोईर, शिवसेना उपनेते इरफान सय्यद, कला,क्रीडा व सांस्कृतिक विभाग सभापती कैलास कुटे, नगरसेवक शितल शिंदे, तुषार हिंगे, मंदार देशपांडे, कुशाग्र कदम, योगेश बहल, बापूशेठ घोलप, नगरसेविका अनुराधा गोरखे, सदाशिव खाडे, नेताजी शिंदे, गणेश लंगोटे, राजू दुर्गे, कुणाल लांडगे, युवराज लांडे, देवदत्त लांडे, सुजाता पलांडे, वैशाली खाडे, धरम वाघमारे, मंगेश घाडगे, अनिता वाळुंजकर आदी मान्यवर उपस्थित होते.

सामाजिक परिवर्तनाचे प्रतीक..
लोकशाहीर, साहित्यरत्न डॉ. अण्णा भाऊ साठे हे केवळ एका समाजाचे नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचे आणि देशाचे अभिमानास्पद साहित्यरत्न आणि सामाजिक परिवर्तनाचे प्रणेते होते. आपल्या अजरामर साहित्य, शाहिरी आणि क्रांतिकारी कार्यातून त्यांनी वंचित, शोषित, कष्टकरी व बहुजन समाजाला स्वाभिमान, संघर्ष आणि सामाजिक न्यायाची प्रखर शिकवण दिली. या वैचारिक वारशाला अभिवादन करण्यासाठी आमदार अमित गोरखे यांच्या पुढाकाराने आयोजित केलेली ही दौड केवळ एक क्रीडा स्पर्धा नसून सामाजिक समरसता, आरोग्यदायी जीवनशैली आणि युवकांच्या सशक्त सहभागाचा एक मोठा संदेश देणारा महत्त्वपूर्ण सामाजिक उत्सव ठरला आहे.




















Join Our Whatsapp Group