गुन्हे शाखा युनिट-३ कडून १२ तासांच्या आत गुन्ह्याचा उलगडा
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-३ च्या टीमने अवघ्या १२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत तब्बल १३ लाख ९८ हजार ९७८ रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत केले आहेत. या प्रकरणातील तपासात धक्कादायक बाब समोर आली असून, चोरी झाल्याचा दावा करण्यात आलेले दागिने प्रत्यक्षात घरातच लपवून ठेवण्यात आल्याचे निष्पन्न झाले.

दिघी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखा युनिट-३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली समांतर तपास सुरू करण्यात आला. या तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण तसेच शेजारी व रहिवाशांची सखोल चौकशी केली. मात्र, बाहेरील कोणतीही संशयास्पद व्यक्ती इमारतीत आल्याचे आढळून आले नाही.

त्यानंतर पोलिसांनी फिर्यादीच्या पत्नीला विश्वासात घेऊन चौकशी केली. पोलीसांनी केलेल्या बारकाईच्या तपासातून आणि घटनाक्रमांच्या सखोल विश्लेषणातून महत्त्वाचे धागेदोरे समोर आले. अखेर फिर्यादीच्या पत्नीने कबुली देत सांगितले की, तिचे पती सोन्या-चांदीचे दागिने विकून नवीन घर खरेदी करण्याच्या तयारीत होते. त्यामुळे दागिने विकले जाऊ नयेत या भीतीपोटी तिने ते घरातच लपवून ठेवले होते. त्यानंतर पंचांसमक्ष लपवून ठेवलेले १३ लाख ९८ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी ते जप्त करून गुन्ह्याचा उलगडा केला. या प्रकरणातील पुढील तपास दिघी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वरे करीत आहेत.

सदरची कामगिरी संतोष कसबे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट ३ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनिल जावळे, पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी, पोलीस अंमलदार युवराज बिराजदार, शशिकांत नांगरे, दिलीप राठोड, नितीन गुंजाळ, निखील फापाळे, स्वप्निल महाले यांनी केली आहे.


















Join Our Whatsapp Group