पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील ११२ कोटी रुपये खर्च करून राबविण्यात आलेल्या दस्तऐवज व्यवस्थापन प्रणाली (DMS) प्रकल्पातील कथित गैरव्यवहार, तांत्रिक त्रुटी आणि ‘सारथी’ हेल्पलाइनकडे होत असलेल्या दुर्लक्षाची सखोल चौकशी करण्याची मागणी माजी विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक विनोद नढे यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे.

याबाबत आयुक्तांना दिलेल्या निवेदनात नढे यांनी म्हटले आहे की, महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता, गतिमानता आणि कागदविरहित कारभारासाठी स्मार्ट सिटी व ईआरपी प्रकल्पांतर्गत सुमारे ११२ कोटी रुपये खर्च करून डीएमएस आणि वर्कफ्लो प्रणाली कार्यान्वित करण्यात आली. मात्र, दीड वर्ष उलटूनही ही प्रणाली सातत्याने तांत्रिक कारणांमुळे बंद पडत असल्याने डिजिटल कारभारावर परिणाम होत असून पुन्हा कागदी फाइल्सवर अवलंबून राहावे लागत आहे.
नढे यांनी प्रकल्पातील उपठेकेदारी प्रक्रियेबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. मूळ ठेकेदार संस्थेने हे काम दुसऱ्या आणि त्यानंतर तिसऱ्या उपठेकेदाराकडे अवघ्या साडेनऊ कोटी रुपयांत सोपवल्याची माहिती समोर आली असून, त्यामुळे प्रकल्पाच्या गुणवत्तेवर परिणाम झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या संदर्भात स्वतंत्र चौकशीची मागणीही त्यांनी केली आहे.

तसेच ऑनलाइन प्रणालीमध्ये फाइल कोणत्या अधिकाऱ्याकडे किती काळ प्रलंबित आहे, याची स्पष्ट नोंद राहत असल्याने काही अधिकारी जाणीवपूर्वक डिजिटल प्रणालीऐवजी कागदी फाइल्सना प्राधान्य देत असल्याचा आरोपही नढे यांनी केला आहे. दरम्यान, तत्कालीन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या काळात सुरू करण्यात आलेली ‘सारथी’ हेल्पलाइन नागरिकांच्या तक्रारींच्या निवारणासाठी प्रभावी माध्यम ठरली होती. मात्र, सध्या या हेल्पलाइनकडे आणि नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी वाढल्याचेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

मुख्य मागण्या :
डीएमएस प्रकल्पाचे स्वतंत्र तांत्रिक व आर्थिक विशेष लेखापरीक्षण करावे.
उपठेकेदारी प्रक्रियेची दक्षता विभाग किंवा संबंधित यंत्रणेमार्फत उच्चस्तरीय चौकशी करावी.
दोषी अधिकारी व संबंधित ठेकेदारांवर दंडात्मक आणि फौजदारी कारवाई करावी.
‘सारथी’ हेल्पलाइनवरील प्रलंबित तक्रारींची फेरतपासणी करून नागरिकांना जलद सेवा उपलब्ध करून द्यावी.
या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन चौकशी समिती गठीत करावी, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन व कायदेशीर लढा उभारला जाईल, असा इशाराही विनोद नढे यांनी दिला आहे.



















Join Our Whatsapp Group