पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरात चर्चेत असलेल्या ‘गोल्डन गाईज’च्या आणखी एका आलिशान गोल्डन मर्सिडीजवर पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणी चालक सनी वाघचौरे आणि वाहन मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी ६ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे.

पिंपरीतील साई चौक परिसरात गस्तीवर असताना वाहतूक पोलिसांना GJ 06 PE 4444 क्रमांकाची गोल्डन मर्सिडीज-बेंझ आढळून आली. वाहनाची तपासणी केली असता काचांवर नियमबाह्य काळी फिल्म, फॅन्सी नंबर प्लेट, नोंदणी न करता बदललेला वाहनाचा रंग, वैध विम्याचा अभाव तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वाहन उभे केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

पोलिसांनी तातडीने कारवाई करत काळी फिल्म आणि फॅन्सी नंबर प्लेट जागीच काढून ताब्यात घेतली. मोटार वाहन कायद्यातील विविध तरतुदींच्या उल्लंघनाबद्दल चालक आणि वाहन मालकाविरुद्ध कारवाई करण्यात आली.

गोल्डन गाईजच्या वाहनांवर यापूर्वीही वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. आता तिसऱ्या वाहनावरही कारवाई झाल्याने, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांबाबत पोलिसांकडून पुढे कोणती भूमिका घेतली जाते, याकडे लक्ष लागले आहे. वाहतूक नियमांचे पालन करा, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे.

















Join Our Whatsapp Group