पवनानगर (Pclive7.com):- पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रलंबित पुनर्वसनाच्या प्रश्नासाठी येत्या २ ऑक्टोबर रोजी पवना धरणाच्या पायथ्याशी जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा धरणग्रस्त शेतकरी कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मावळचे आमदार सुनील शेळके यांनी धरणग्रस्त शेतकऱ्यांना थेट चर्चेसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे.

धरणग्रस्तांचा प्रश्न आंदोलनाने नव्हे, तर संवाद आणि चर्चेच्या माध्यमातून कायमस्वरूपी मार्गी लागू शकतो, अशी भूमिका आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केली. “तुम्ही चर्चेसाठी या, किंवा मला बोलवा; मी तुमच्याकडे येतो. मात्र आधी चर्चा करूया,” असे आवाहन त्यांनी धरणग्रस्त शेतकऱ्यांना केले आहे.
पवना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न हा केवळ राजकीय विषय नसून, धरणासाठी आपल्या जमिनी दिलेल्या शेतकरी कुटुंबांच्या भवितव्याशी जोडलेला प्रश्न आहे, अशी भूमिका आमदार शेळके यांनी मांडली. त्यामुळे धरणग्रस्तांच्या प्रश्नाबाबत आपण सुरुवातीपासूनच आग्रही असून, निवडून आल्यापासून शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला असल्याचे त्यांनी सांगितले.

पुनर्वसनाच्या प्रश्नासाठी शासनाच्या विविध स्तरांवर बैठका घेण्यात आल्या असून, मुख्यमंत्र्यांसोबतही याबाबत चर्चा झाल्याचे आमदार शेळके यांनी सांगितले. त्यामुळे धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी आपला पाठपुरावा थांबलेला नाही आणि हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण पूर्ण ताकदीने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प आणि धरणग्रस्तांचे पुनर्वसन याबाबत नागरिकांच्या मनात काही गैरसमज निर्माण करण्यात आले आहेत, असेही आमदार शेळके यांनी म्हटले. पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागण्यापूर्वी बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प पुढे आणला जाणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे. “माझ्या शेतकऱ्यांचे पुनर्वसन होण्यापूर्वी बंदिस्त जलवाहिनीचा विषय पुढे आला, तर मी माझ्या पदाचा राजीनामा देऊन घरी बसेन,” असे त्यांनी स्पष्ट केले.

“पुनर्वसन होणारच, त्याबाबत कोणतीही शंका बाळगू नका,” असा विश्वासही आमदार शेळके यांनी धरणग्रस्त शेतकऱ्यांना दिला. काही मंडळी या प्रश्नात राजकारण करत असल्याचा आरोप करत, राजकारण बाजूला ठेवून धरणग्रस्तांनी चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.
२ ऑक्टोबरच्या जलसमाधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आमदार शेळके यांनी “आंदोलन करायचे असेल तर करा, त्याला माझी हरकत नाही; मात्र त्याआधी एकदा चर्चेला या,” अशी भूमिका मांडली आहे. त्यामुळे आता धरणग्रस्त शेतकरी आणि आमदार यांच्यातील चर्चेतून पुनर्वसनाच्या प्रश्नावर कोणता मार्ग निघतो, याकडे मावळ तालुक्याचे लक्ष लागले आहे.


















Join Our Whatsapp Group