पिंपरी (Pclive7.com):- हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तब्बल १६ वर्षांपूर्वीच्या खूनप्रकरणात न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. हिंजवडी पोलिसांच्या शास्त्रोक्त तपास, प्रभावी पुरावे आणि सातत्यपूर्ण न्यायालयीन पाठपुराव्यामुळे हा निकाल लागला.

१४ एप्रिल २०१० रोजी पहाटे शिंदेनगर येथील अपराजिता सोसायटीमध्ये आरोपी सुबोजित बासू याने व्यवसायातील नुकसानीमुळे नैराश्यातून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यावेळी त्याची बहीण प्रियदर्शिनी बासू (वय २३ वर्षे) हिने त्याला विरोध केला. त्याचा राग आल्याने आरोपीने तिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर स्वतःच्या डाव्या हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक आर. टी. पवार यांनी घटनास्थळावरील पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपीविरुद्ध भक्कम दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.

पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या निर्देशानुसार या गुन्ह्याची “स्टार केस” म्हणून निवड करण्यात आली होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळोवेळी प्रकरणाचा आढावा घेत आवश्यक मार्गदर्शन केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्याकडे या प्रकरणाचा न्यायालयीन पाठपुरावा सोपविण्यात आला होता. सुनावणीदरम्यान सरकारी अभियोक्ता लिना पाठक यांनी सरकारची बाजू प्रभावीपणे मांडली. तसेच साक्षीदारांना न्यायालयात हजर ठेवणे, सीए अहवाल प्राप्त करणे, मुद्देमाल सादर करणे आणि न्यायालयीन प्रक्रियेचा सातत्याने पाठपुरावा करण्यात पोलिसांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

उपलब्ध पुरावे आणि साक्षीदारांचे जबाब ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपी सुबोजित बासू याला भारतीय दंड संहिता कलम ३०२ अंतर्गत जन्मठेप व १० हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास अतिरिक्त एक महिन्याच्या कारावासाची शिक्षा देखील ठोठावण्यात आली आहे. या निकालामुळे १६ वर्षांपूर्वीच्या खूनप्रकरणात पीडितेला न्याय मिळाला असून हिंजवडी पोलिसांच्या तपास आणि न्यायालयीन पाठपुराव्याला मोठे यश मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.


















Join Our Whatsapp Group