पिंपरी (Pclive7.com):- ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार, इतिहास अभ्यासक, संपादक आणि सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव शिर्के यांना पिंपरी-चिंचवड शहरातील विविध साहित्यिक व सामाजिक संस्थांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली. संभाजीनगर, आकुर्डी येथील महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या आदरांजली सभेला विविध क्षेत्रातील मान्यवर, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते आणि गुणवंत कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी ह.भ.प. शामराव गायकवाड यांनी प्रवचनाद्वारे शिवाजीराव शिर्के यांच्या कार्याचा गौरव केला. यानंतर गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या अध्यक्षा डॉ. भारती चव्हाण यांनी शिर्के यांच्या साहित्य, पत्रकारिता, इतिहास संशोधन आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाचा आढावा घेतला. तसेच त्यांच्या ‘येसूबाई’ या पुस्तकाची इंडिया बुकमध्ये नोंद झाल्याची माहितीही त्यांनी उपस्थितांना दिली.

यावेळी बंधुता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश रोकडे, कामगार नेते अरुण बोऱ्हाडे, अशोककुमार पगारिया, नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळाचे अध्यक्ष राज अहेरराव, पिंपरी-चिंचवड व्याख्यानमाला समन्वय समितीचे राजेंद्र घावटे, दिलासा संस्था व शब्दधन काव्यमंचाचे अध्यक्ष सुरेश कंक, मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्थेचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, कलारंजन प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत चौगुले, वसुंधरा पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष तानाजी एकोंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

सभेत उपस्थित मान्यवरांनी शिवाजीराव शिर्के यांच्या साहित्यिक, पत्रकारितेतील आणि सामाजिक कार्यातील योगदानाच्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या कार्यामुळे समाजातील विविध क्षेत्रांमध्ये निर्माण झालेला प्रभाव आणि त्यांनी जपलेली सामाजिक बांधिलकी याबाबतही वक्त्यांनी मनोगत व्यक्त केले. या आदरांजली सभेला शहरातील असंख्य साहित्यिक, गुणवंत कामगार आणि सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सांगता हरिभक्त परायण साखरचंद लोखंडे यांनी सादर केलेल्या पसायदानाने करण्यात आली.


















Join Our Whatsapp Group