पिंपरी (Pclive7.com):- कासारवाडी रेल्वे गेट बंद करण्याच्या प्रस्तावाविरोधात कासारवाडी नागरी कृती समितीच्या वतीने आज (दि.०२) कासारवाडी रेल्वे गेट परिसरात आयोजित करण्यात आलेल्या जनस्वाक्षरी मोहिमेला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. अवघ्या ३ तासांत सुमारे ११०० नागरिकांनी स्वाक्षरी करून रेल्वे गेट बंद करण्याचा निर्णय मागे घेण्याची मागणी केली.

या मोहिमेदरम्यान रेल्वे गेट परिसरात नागरिकांना गेट बंद झाल्यास उद्भवणाऱ्या अडचणींची माहिती देण्यात आली. रेल्वे गेट हे कासारवाडीच्या गेटवरील व गेटखालील भागांना जोडणारा प्रमुख दुवा असून स्मशानभूमी, गणेश विसर्जन घाट तसेच धार्मिक व सामाजिक मिरवणुकांसाठी हा महत्त्वाचा मार्ग असल्याचे नागरिकांनी सांगितले.

या जनस्वाक्षरी मोहिमेत ॲड.अमित चौकडे, सनी साळवी, अनिल घोरपडे, ॲड.अजित शिंदे, गुरुनाथ कुरले, पंकज तांबे, राहुल धोणे, संभाजी शेंडगे, जयदीप साने, सक्षम देसाई यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

कासारवाडी नागरी कृती समितीचे संयोजक श्री. संजय शेंडगे सर म्हणाले, “आमचा विकासाला कोणताही विरोध नाही. मात्र विकासाच्या नावाखाली नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवणे योग्य नाही. कासारवाडी रेल्वे गेट हे हजारो नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित आहे. त्यामुळे रेल्वे गेट बंद करण्याचा निर्णय तात्काळ रद्द करून नागरिकांच्या हिताचा विचार करावा. तसेच या ठिकाणी उड्डाणपूल (ROB) किंवा भुयारी मार्ग (RUB) उभारण्याचा निर्णय घेऊन रेल्वेला समांतर रस्त्याचे कामही तातडीने पूर्ण करावे. जनस्वाक्षरी मोहिमेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा कासारवाडीकरांच्या एकजुटीचा आवाज असून, हा आवाज शासन व रेल्वे प्रशासनापर्यंत निश्चितपणे पोहोचविण्यात येईल.”
कासारवाडी नागरी कृती समितीने या जनस्वाक्षरी मोहिमेतील सर्व स्वाक्षऱ्या संबंधित प्रशासन व लोकप्रतिनिधींना सादर करून रेल्वे गेट बंद करण्याचा निर्णय मागे घेण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले.




















Join Our Whatsapp Group