पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरातील मोरवाडी परिसरातील करिष्मा ग्लोरी सोसायटीमध्ये आर्थिक अडचणींना कंटाळून एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत कुटुंबप्रमुख विनोद पिल्लाई (वय ५०) यांचा मृत्यू झाला असून पत्नी शैलेजा पिल्लाई आणि मुलगी पूर्णिमा पिल्लाई यांच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पिल्लाई कुटुंबाने राहत्या घरात कोळशाचा धूर करून तसेच विषारी औषधाचे सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही बाब समोर आल्यानंतर तिघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच विनोद पिल्लाई यांचा मृत्यू झाला, तर पत्नी आणि मुलीची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

हे कुटुंब मूळचे केरळ राज्यातील असून काही वर्षांपासून मोरवाडी परिसरात भाड्याने राहत होते. घटनास्थळी पोलिसांना एक सुसाईड नोट आढळून आली आहे. या चिठ्ठीत आर्थिक विवंचना आणि वाढत्या कर्जबाजारीपणामुळे हे टोकाचे पाऊल उचलल्याचा उल्लेख असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

घटनेची माहिती मिळताच संत तुकाराम नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून आत्महत्येच्या प्रयत्नामागील नेमके कारण, आर्थिक व्यवहार आणि इतर बाबींचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे मोरवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत असून आर्थिक संकटामुळे एका कुटुंबावर ओढवलेल्या या दुर्दैवी प्रसंगाने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.




















Join Our Whatsapp Group