पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आयुक्त व महापौर यांच्यासाठी आलिशान वाहनांची खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठीच्या प्रस्तावास स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी (दि.१७) आयत्यावेळी मान्यता देण्यात आली. महापौर व आयुक्तांच्या दिमतीला वाहने असताना देखील वाहन खरेदी करत उधळपट्टी केली जात आहे. तर, बचत आणि काटकसरीचे धोरण राजकीय आणि प्रशासकीय प्रमुखांनीच फाट्यावर मारल्याचे हे उदाहरण आहे.

आयुक्त यांच्या कार्यालयीन कामाकाजासाठी सात आसन क्षमता असलेले अलिशान वाहन खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी निविदा न काढता मे. टोयाटो किर्लोस्कर मोटार प्राय. लि. या कंपनीकडे शासकीय दराची मागणी केली होती. कंपनीने एका वाहनासाठी १८ लाख ८० हजार ७२१ अधिक जीएसटी असा दर दिला आहे. तर वाहन नोंदणी, विमा, वाहतूक खर्च, परिवहन विमा हे वाहन खरेदीच्या वेळी लागू होणार आहे. यासाठी निविदा न मागवता कंपनीला आगाऊ रक्कम अदा करण्यात येणार आहे. त्याला स्थायी समितीने मान्यता दिली.

आयुक्तांसह महापौर यांच्यासाठी देखील नवीन इलेक्ट्रीक वाहन खरेदी करण्यात येणार आहे. ते देखील थेट पद्धतीने खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीकडे दर मागविण्यात आले होते. कंपनीने महिंद्रा एक्सईव्ही ९५ या वाहनासाठी २९ लाख ३५ हजार ३६७ असा दर सादर केला आहे. तर यामध्ये देखील वाहन नोंदणी, विमा, वाहतूक खर्च, परिवहन विमा हे वाहन खरेदीच्या वेळी लागू होणार आहे. त्यामुळे हे वाहन सुमारे ३१ लाख रुपयांपर्यंत जाणार आहे. तर आयुक्तांसाठी खरेदी करण्यात येणाऱया वाहनाची किंमत २१ लाख रुपयांपर्यंत असणार आहे.





















Join Our Whatsapp Group