बिले व अनामत रक्कम रोखण्याची नगरसेवक विनोद नढे यांची मागणी
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करआकारणी व करसंकलन विभागातील मालमत्ता सर्वेक्षण आणि करआकारणीच्या कामकाजात गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करत माजी विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक विनोद नढे यांनी आयुक्तांकडे सखोल चौकशीची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी लेखी निवेदन सादर करून संबंधित खासगी संस्था ‘स्थापत्य कन्सल्टंट्स’ यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

विनोद नढे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मालमत्ता सर्वेक्षण व करआकारणीचे महत्त्वाचे काम स्थापत्य कन्सल्टंट्स या संस्थेला देण्यात आले होते. मात्र, या कामात चुकीची करआकारणी, अस्तित्वात नसलेल्या मालमत्तांची नोंद, अधिकृत नोंदींचे उल्लंघन तसेच महसुलाचे नुकसान झाल्याची शक्यता असल्याचे विविध तक्रारींमधून समोर आले आहे. तसेच काही मालमत्तांवर दुबार करआकारणी करून बिले काढण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. संस्थेने मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ वापरले असले तरी संबंधित कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन दिले आहे का, याची तपासणी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

निवेदनानुसार, महापालिकेचे अनुभवी अधिकारी उपलब्ध असतानाही नागरिकांनी सादर केलेल्या करसंबंधी फाईल्स खासगी संस्थेकडून हाताळल्या जात असल्याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. यामागे कोणाच्या आदेशाने आणि कोणत्या प्रक्रियेनुसार कामकाज झाले, याची चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय, ड्रोन सर्वेक्षण, जीआयएस सर्वेक्षण, उपग्रह प्रतिमा, अंतिम अहवाल आणि प्रत्यक्ष जमिनीवरील स्थिती यांची तांत्रिक पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच संस्थेच्या कर्मचाऱ्यांचे वेतन वाटप, पीएफ, ईएसआयसी आणि कामगार विभागाकडे सादर केलेल्या नोंदींची तपासणी करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय, पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित संस्थेची प्रलंबित बिले, अंतिम देयके आणि अनामत रक्कम रोखून ठेवावीत, अशी मागणी विनोद नढे यांनी आयुक्तांकडे केली आहे. चौकशीत दोषी आढळल्यास संबंधित संस्था आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.




















Join Our Whatsapp Group