आळंदी (Pclive7.com):- देवाच्या आळंदीची ओळख आता वाहतूक कोंडीची जीवघेणी आळंदी अशी बनण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कारण आळंदी शहरातील भीषण ट्रॅफिक जाममुळे उपचाराला उशीर झाल्याने सीआरपीएफचे निवृत्त जवान भिमाजी चौरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जगन्नाथ पार्क परिसरात राहणारे भिमाजी चौरे (वय अंदाजे 60) यांना रविवारी त्यांच्या राहत्या घरी अचानक तीव्र हृदयविकाराचा झटका आला. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. घरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या के.के. हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करायचे होते. मात्र, पद्मावती रोड परिसरातील मंगल कार्यालयांमध्ये सुरू असलेल्या लग्न समारंभांमुळे रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.

वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने चौरे यांना घेऊन जाणारे चारचाकी वाहन पुढे सरकू शकले नाही. अखेर कुटुंबीयांनी गाडी रस्त्यातच सोडून रिक्षाने रुग्णालय गाठण्याचा निर्णय घेतला. रिक्षाला मार्ग मिळावा म्हणून त्यांच्या पत्नी आणि मुलगी रस्त्यावर धावत जाऊन वाहनचालकांना विनवण्या करत होत्या. दरम्यान, मुलगा वडिलांना वाचवण्यासाठी सीपीआर देत होता. परंतु, अवघ्या 2-3 मिनिटांच्या अंतरासाठी तब्बल 20 मिनिटे लागल्याने ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार मिळू शकले नाहीत. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच भिमाजी चौरे यांची प्राणज्योत मालवली.

भिमाजी चौरे यांनी तब्बल 23 वर्षे देशसेवा केली होती. मात्र, निवृत्तीनंतर आपल्या शहरातील कुचकामी वाहतूक व्यवस्थेमुळे त्यांचा जीव गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमुळे आळंदीतील वाहतूक नियोजनाचा बोजवारा उडाल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. दरम्यान, या गंभीर प्रकारानंतरही आळंदी नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनाने कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नसल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे.





















Join Our Whatsapp Group