पिंपरी (Pclive7.com):- सोशल मीडियावर व्हायरल होण्याच्या नादात तरुणाई जीवाशी खेळत असल्याचे आणखी एक धक्कादायक उदाहरण काळेवाडी येथे समोर आले आहे. वर्दळीच्या तापकीर चौकात दोन अल्पवयीन मुलांनी धावत्या दुचाकीवर अंघोळ करत स्टंटबाजी केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या कृत्यामुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काळेवाडीतील तापकीर चौकातून दुचाकीवरून जात असताना मागे बसलेल्या मुलाच्या हातात पाण्याची बादली होती. धावत्या दुचाकीवरच त्याने अंगावर पाणी ओतून घेत अंघोळ केली. हा संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये कैद करून सोशल मीडियावर रिल्स बनवण्यासाठी करण्यात आल्याचे समजते.

भरधाव वाहतूक सुरू असताना आणि चौकात मोठी गर्दी असताना केलेल्या या धोकादायक स्टंटमुळे संबंधित मुलांनी स्वतःचा जीव धोक्यात घातलाच, शिवाय इतर वाहनचालकांच्या सुरक्षेलाही धोका निर्माण केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पिंपरी-चिंचवडकर नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

नागरिकांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, “रिल्सच्या नादात अल्पवयीन मुले वाहतूक नियम धाब्यावर बसवत आहेत. अशा स्टंटबाजीमुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.” संबंधित मुलांवर तसेच त्यांच्या पालकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही स्थानिकांकडून केली जात आहे. दरम्यान, या प्रकाराची दखल घेऊन वाहतूक पोलिसांकडून काय कारवाई केली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





















Join Our Whatsapp Group