धर्मांतराच्या षडयंत्राविरोधात काळेवाडीत ‘आक्रोश’ मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईसाठी जनसमुदाय रस्त्यावर
पिंपरी (Pclive7.com):- आमिषे दाखवून आणि अंधश्रद्धेचा प्रसार करून हिंदूंचे बेकायदेशीर धर्मांतर करणाऱ्या प्रवृत्तींविरोधात रविवारी काळेवाडीत ‘आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. ‘काळेवाडी कन्वर्जन फाईल्स’ मधील सत्य समोर आणून दोषींना शिक्षा व्हावी, या मागणीसाठी हजारो हिंदू बांधव आणि महिला या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. “प्रशासनाने हिंदूंच्या संयमाचा अंत पाहू नये, अन्यथा पुढच्या परिणामांना सरकार जबाबदार असेल,” असा इशारा आमदार शंकर जगताप यांनी यावेळी दिला.

काळेवाडीतील पंचनाथ चौक ते आबाजी नाणेकर चौक दरम्यान हा मोर्चा काढण्यात आला. या आक्रोश मोर्चात आमदार गोपीचंद पडळकर, आमदार उमा खापरे, ॲड. वर्षाताई डहाळे, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, पक्षनेते प्रशांत शितोळे, नगरसेवक विनोद नढे, नगरसेविका नीता पाडाळे, कोमल काळे, सरचिटणीस वैशाली खाडये, चिंचवड-काळेवाडी मंडळ अध्यक्ष ॲड. हर्षद नढे, सामाजिक कार्यकर्ते काळूराम नढे तसेच विविध हिंदू सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोर्चाला संबोधित करताना आमदार जगताप म्हणाले की, “विज्ञानाच्या युगात प्रार्थना करून आजार बरे करण्याचे दावे करणे ही शुद्ध फसवणूक आहे. जर असे असते तर रुग्णालयांची गरजच उरली नसती. गरिबी आणि अज्ञानाचा फायदा घेऊन चाललेला हा धर्मांतराचा बाजार आम्ही पिंपरी-चिंचवडमध्ये चालू देणार नाही. महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून आरोपींना १० लाखांपर्यंत दंड आणि कठोर शिक्षा झालीच पाहिजे.”

यावेळी आमदार जगताप यांनी नागरिकांना आवाहन केले की, “आपल्या शेजारी काय घडतेय याकडे डोळेझाक करू नका. असे संशयास्पद प्रकार आढळल्यास तात्काळ प्रशासनाला किंवा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना कळवा,” असे आवाहन जगताप यांनी केले. तसेच, विधिमंडळात यावर चर्चा झाली असून मंत्र्यांनीही कारवाईचे निर्देश दिले असल्याचे त्यांनी नमूद केले.
गोपीचंद पडळकर म्हणाले, “महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायद्याच्या माध्यमातून अशा प्रकारांना लगाम घालण्याची तरतूद करण्यात आली असली, तरी त्याची काटेकोर अंमलबजावणी होणे तितकेच आवश्यक आहे. केवळ कायदे करून प्रश्न सुटणार नाहीत, तर प्रशासनाने अशा प्रवृत्तींच्या मुळाशी जाऊन त्यांना ठेचले पाहिजे. गरिबी आणि अगतिकतेचा फायदा घेऊन जर कोणी हिंदू समाजाला लक्ष्य करत असेल, तर आम्ही गप्प बसणार नाही. आजचा हा जनसमुदाय म्हणजे हिंदू समाजाच्या संतापाचा उद्रेक आहे. जर वेळीच कारवाई झाली नाही, तर हा आक्रोश संपूर्ण महाराष्ट्रात पसरेल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल.”
मोर्चातील प्रमुख मागण्या..
- बेकायदेशीर धर्मांतर करणाऱ्या मुख्य सूत्रधारांना तात्काळ अटक करा.
- अंधश्रद्धा पसरवणाऱ्या प्रार्थना स्थळांची चौकशी करून ती बंद करा.
- पिंपरी-चिंचवडमधील सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करा.




















Join Our Whatsapp Group