बारामती (Pclive7.com):- अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. सुनेत्रा पवार यांनी केवळ विजयच मिळवला नाही, तर अजितदादांनी २०१९ मध्ये प्रस्थापित केलेला विक्रमी मताधिक्याचा विक्रमही मोडीत काढला आहे. त्यांनी तब्बल २ लाख १४ हजार ९३ मतांच्या फरकाने प्रतिस्पर्ध्यांचा धुव्वा उडवला.

या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांना एकूण २ लाख १८ हजार ९३० मते मिळाली, तर त्यांच्या विरोधात उभे राहिलेले सर्व २२ उमेदवार आणि ‘नोटा’ यांना मिळून अवघ्या ४,८३७ मतांवर समाधान मानावे लागले. अजित पवार यांनी २०१९ मध्ये भाजपच्या गोपीचंद पडळकर यांचा १ लाख ६५ हजार २६५ मताधिक्याने पराभव केला होता. सुनेत्रा पवार यांनी २ लाख १४ हजार ९३ मताधिक्य मिळवून हा विक्रम आता आपल्या नावावर केला आहे.

बारामती एमआयडीसी येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली. टपाली मतपत्रिका आणि पहिल्या फेरीपासूनच सुनेत्रा पवार यांनी आपले वर्चस्व कायम राखले. पहिल्या फेरीत ६,५०० मतांची आघाडी घेतल्यानंतर प्रत्येक फेरीगणिक हे मताधिक्य वाढतच गेले. सहाव्या फेरीअखेर त्यांनी ५० हजार मतांचा टप्पा पार केला आणि २४ व्या फेरीअखेर त्यांच्या विक्रमी विजयाची अधिकृत घोषणा करण्यात आली.

या निवडणुकीसाठी एकूण ३ लाख ८४ हजार ५७९ मतदारांपैकी २ लाख २४ हजार ८७ मतदारांनी (५८.२७ टक्के) मतदानाचा हक्क बजावला होता. सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न झाले होते, मात्र २२ उमेदवारांनी माघार न घेतल्याने मतदान प्रक्रिया पार पडली. रिंगणात काँग्रेसचे उमेदवार नसल्याने प्रमुख राजकीय पक्षाचा एकही प्रबळ उमेदवार मैदानात नव्हता. करुणा मुंडे आणि अभिजित बिचुकले यांच्यासह रिंगणात असलेल्या २२ अपक्ष व इतर उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले असून बारामतीकरांनी पुन्हा एकदा सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वावर एकतर्फी विश्वास दर्शवला आहे.




















Join Our Whatsapp Group