पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी येथील हिंदुस्थान अँटीबायोटीक्स कंपनीच्या प्रलंबित प्रश्नांबाबत खासदार श्रीरंग बारणे यांनी आज केंद्रीय केमिकल फर्टीलायझर मंत्री सदानंद गौडा यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
पिंपरी येथील हिंदुस्थान अँटीबायोटीक्स ही भारत सरकारची कंपनी अनेक समस्यांनी ग्रासली आहे. कंपनीच्या कामगारांचा १९ महिन्याचा पगार प्रलंबित असून कंपनीकडे पुरेसे पैसे नसल्याने कंपनी चालू ठेवणे व्यवस्थापनाला कठीण जात आहे. कंपनीच्या जमीन विक्रीची परवानगी मिळूनही जमिनीची विक्री होऊ शकली नाही. यासाठी दोन वेळा जाहिरात प्रसिद्ध करूनही कोणी खरेदीदार पुढे आला नाही. या सर्व कारणाने कंपनी चालू ठेवणे अधिकच कठीण झाले आहे.
खासदार श्रीरंग बारणे यांच्या पाठपुराव्याने कंपनीला केंद्र सरकार कडून १०० कोटी रुपयाचे आर्थिक सहाय्य मिळाले होते. त्यात कंपनीच्या कामगारांचा थकीत पगार देऊन कंपनीचे उत्पादन चालू करण्यात आले आहे. कंपनी सुस्थित चालू ठेवण्यासाठी मोठा निधी आवश्यक आहे. कंपनी पूर्वस्थितीत आणण्यासाठी तसेच सेवा निवृतीची रक्कम व कामगारांचे थकीत पगार देण्यासाठी केंद्रीय केमिकल फर्टीलायझर मंत्रालयाने केंद्रीय आर्थिक संबधि कॅबिनेट कमिटी पुढे ४५० करोड रुपये कंपनीस देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यास आज पर्यंत मंजुरी मिळाली नसल्याने एच.ए. कंपनीच्या अडचणी अधिकच वाढत चालल्या आहेत. खासदार श्रीरंग बारणे यांनी आज संबधित खात्याचे मंत्री सदानंद गौडा यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
सरकार या प्रश्नांबाबत सकारात्मक असून या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी संबधित विभागाच्या आधिकाऱ्यांसमवेत बैठक बोलावली असुन एच.ए कंपनीला सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे केंद्रीय मंत्री सदानंद गौडा म्हणाले असल्याचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या प्रत्रकात म्हटले आहे.





















Join Our Whatsapp Group