पिंपरी (Pclive7.com):- वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे मावळ तालुक्यातील पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत असून सध्या धरणात केवळ २५ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. हा साठा जून अखेरपर्यंत पुरेल, असा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त केला जात असला तरी मान्सून उशिरा दाखल झाल्यास पिंपरी-चिंचवड शहरावर पाणीटंचाईचे गंभीर संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून सध्या रावेत बंधाऱ्यातून दररोज सुमारे ५५० एमएलडी पाणी उचलण्यात येत आहे. हे पाणी निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून शहरातील विविध भागांना पुरवले जाते. मात्र, धरणातील पाणीपातळी दिवसेंदिवस खालावत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

दरम्यान, पवना नदीपात्र अनेक ठिकाणी कोरडे पडू लागल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळून काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. वाहन धुणे, बागांना अतिरिक्त पाणी देणे तसेच विनाकारण पाण्याचा वापर टाळण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

मान्सून वेळेत आणि समाधानकारक झाल्यास परिस्थिती नियंत्रणात राहू शकते. मात्र, पाऊस लांबल्यास शहरातील पाणीपुरवठ्यावर निर्बंध येण्याची शक्यता नाकारता येत नाही.




















Join Our Whatsapp Group