वाकड (Pclive7.com):- जिद्द, चिकाटी, शिस्त आणि अथक मेहनतीच्या जोरावर पिंपळे निलख येथील सुपुत्राने आंतरराष्ट्रीय स्तरावर अभिमानास्पद यश संपादन केले आहे. उद्योजक समाधान वाकचौरे यांनी व्हिएतनाम येथे आयोजित करण्यात आलेली जगप्रसिद्ध आणि अत्यंत कठीण मानली जाणारी “IRONMAN Vietnam 2026” स्पर्धा तब्बल १३ तास २७ मिनिटे २० सेकंदांत यशस्वीरित्या पूर्ण करून पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्राचा गौरव वाढविला आहे.

या स्पर्धेमध्ये २.४ मैल पोहणे, १८० किलोमीटर सायकलिंग आणि ४२.२ किलोमीटर मॅरेथॉन धाव अशा अत्यंत कठोर शारीरिक व मानसिक क्षमतेच्या टप्प्यांचा समावेश असतो. जगभरातील निवडक स्पर्धकच ही स्पर्धा पूर्ण करू शकतात. अशा प्रतिष्ठेच्या स्पर्धेत यश मिळविणे म्हणजे असामान्य जिद्द आणि आत्मविश्वासाचे प्रतीक मानले जाते.

विशेष म्हणजे कोणतीही क्रीडा पार्श्वभूमी नसताना, मधुमेहासारख्या आरोग्याच्या आव्हानांवर मात करत तसेच व्यवसाय आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत समाधान वाकचौरे यांनी हा प्रेरणादायी प्रवास पूर्ण केला. त्यामुळे त्यांचे यश अनेक युवकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल नगरसेविका स्नेहा रणजित कलाटे यांच्या हस्ते समाधान वाकचौरे यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला व पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी स्नेहा कलाटे म्हणाल्या की, “समाधान वाकचौरे यांनी अत्यंत कठीण समजली जाणारी ‘आयर्नमॅन’ स्पर्धा पूर्ण करून शहराचा आणि महाराष्ट्राचा सन्मान वाढविला आहे. त्यांची जिद्द, शिस्त आणि संघर्षमय प्रवास हा तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.”
समाधान वाकचौरे यांचा हा दैदिप्यमान पराक्रम अनेकांना निरोगी जीवनशैली, चिकाटी आणि आत्मविश्वासाची प्रेरणा देणारा ठरणार आहे.




















Join Our Whatsapp Group