पिंपरी (Pclive7.com):- प्रभाग क्र. २५ मधील सूर्या हॉस्पिटल ते पुनावळे हद्द या परिसरातील मुंबई–पुणे हायवे लगतच्या सर्विस रोडच्या दोन्ही बाजूस महानगरपालिका हद्दीतील १२ मीटर रुंद रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत टपऱ्या, लाकडी शेड तसेच इतर बेकायदेशीर बांधकामे उभारण्यात आली असल्याबाबत नगरसेविका श्रुती राम वाकडकर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.

या अनधिकृत टपऱ्या आणि बांधकामांमुळे फुटपाथ अडवला गेला असून पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावे लागत आहे. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून वाहतुकीलाही मोठा अडथळा निर्माण होत आहे. सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेत या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांकडून सातत्याने होत आहे.

याशिवाय या टपऱ्यांमुळे परिसरात अस्वच्छता वाढत असून काही ठिकाणी अनधिकृत वीज जोडण्यांचाही धोका निर्माण झाला आहे. सार्वजनिक सुरक्षितता आणि नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने ही बाब अत्यंत गंभीर असल्याने प्रशासनाने तातडीने दखल घेणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

नगरसेविका श्रुती वाकडकर यांनी महानगरपालिका प्रशासनास सदर ठिकाणाची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अनधिकृत टपऱ्या व बांधकामांवर तात्काळ अतिक्रमण हटाव कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच रस्ता व फुटपाथ नागरिक आणि पादचाऱ्यांसाठी मोकळा करून देण्यात यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.

स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतूक सुरळीत होण्यासाठी प्रशासनाने त्वरित कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.




















Join Our Whatsapp Group