पिंपरी (Pclive7.com):- चिंचवडमधील मदर तेरेसा उड्डाणपुलावरील एम्पायर इस्टेट बीआरटी बसथांब्यावर एका २४ वर्षीय तरुणीची छेडछाड झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी तातडीने तपास करत आरोपी जाखिर हमीद शेख याला वाल्हेकरवाडी परिसरातून अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २२ मे रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास संबंधित तरुणी कंपनीच्या बसची वाट पाहत बसथांब्यावर उभी होती. त्यावेळी आरोपीने तिच्यासमोर अश्लील हावभाव करत गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. अचानक घडलेल्या प्रकारामुळे तरूणी घाबरली. मात्र, तरुणीने प्रसंगावधान राखत धाडसाने मोबाईलमध्ये आरोपीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केले. आपला व्हिडिओ रेकॉर्ड होत असल्याचे लक्षात येताच आरोपी घाबरला आणि स्वतःची ओळख लपवण्यासाठी अंगावरील जॅकेट व टोपी रस्त्यावर फेकून घटनास्थळावरून पळ काढला.

घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलिसांनी परिसरातील तब्बल १०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तांत्रिक विश्लेषण आणि स्थानिक माहितीच्या आधारे आरोपी जाखिर हमीद शेख याचा माग काढण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर वाल्हेकरवाडी परिसरातून त्याला अटक करण्यात आली.

या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.




















Join Our Whatsapp Group