आळंदी (Pclive7.com):- संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने आळंदी मंदिरातील चोरीप्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली आहे. २२ मे २०२६ रोजी घडलेल्या घटनेनंतर संस्थान प्रशासनाने संबंधित कर्मचाऱ्यांकडून खुलासे मागवले होते. त्यानंतर २९ मे रोजी झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत या प्रकरणाचा आढावा घेऊन कारवाईचा निर्णय घेण्यात आला.

संस्थान समितीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, प्राथमिक निष्कर्षांच्या आधारे एका हंगामी सेवकाची सेवा तत्काळ समाप्त करण्यात आली आहे. तसेच रोखपाल आणि आचारी या दोघांना आरोपी विशाल वारुळे याच्यावरील पोलिस तपास पूर्ण होईपर्यंत निलंबित करण्यात आले आहे.

याशिवाय संबंधित प्रकरणात व्यवस्थापनातील त्रुटी आढळून आल्याने प्रमुख व्यवस्थापकांना भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी सक्त ताकीद देण्यात आली आहे. तसेच संस्थेतील एका सहाय्यक व्यवस्थापकाची सेवाही समाप्त करण्यात आल्याची माहिती पत्रकात नमूद करण्यात आली आहे.
संस्थान समितीने मंदिर प्रशासनातील पारदर्शकता आणि शिस्त अबाधित ठेवण्यासाठी कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट केले असून, पोलिस तपासाच्या निष्कर्षांनुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.




















Join Our Whatsapp Group