पिंपरी (Pclive7.com):- फुगेवाडीतील विषारी दारुकांडानंतर प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून, या प्रकरणातील आरोपी कर्नेलसिंग विरका यांच्या अनधिकृत घरासह दारू अड्ड्यावर गुरुवारी (दि.४) पिंपरी-चिंचवड महापालिकेने पाडकामाची कारवाई सुरू केली आहे. विषारी दारू विक्रीचे केंद्र ठरलेल्या या ठिकाणावर अखेर महापालिकेचा हातोडा पडला आहे.

महापालिकेने २ जून रोजी संबंधित बांधकाम अनधिकृत असल्याचे नमूद करत नोटीस बजावली होती. तसेच २४ तासांच्या आत बांधकाम स्वतःहून हटविण्याचे आदेश दिले होते. मात्र, सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या कर्नेलसिंग विरका यांच्याकडून केवळ घरातील साहित्य हटविण्यात आले. त्यामुळे महापालिकेने आज प्रत्यक्ष पाडकामाची कारवाई हाती घेतली.

कारवाईदरम्यान महापालिकेसमोर काही अडचणीही निर्माण झाल्या. विरका यांच्या घरापर्यंत जेसीबी आणि पोकलेनसारखी मोठी यंत्रसामग्री पोहोचविणे कठीण असल्याने प्रशासनाला लहान यंत्रांचा वापर करावा लागत आहे. काही भागात मनुष्यबळाच्या सहाय्याने मॅन्युअल पद्धतीने पाडकाम करण्यात येत आहे.
फुगेवाडीतील विषारी दारुकांडामुळे अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासन आणि पोलिसांवर मोठा दबाव निर्माण झाला होता. त्यानंतर अवैध दारू व्यवसायाशी संबंधित ठिकाणांवर कारवाईचा धडाका सुरू असून, कर्नेलसिंग विरका यांच्या घरावरील कारवाई ही त्याच मोहिमेचा एक भाग असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.




















Join Our Whatsapp Group