पिंपरी (Pclive7.com):- संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या १९५ व्या आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या नियोजनाचे स्वागत करतानाच, कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा कांबळे यांनी आळंदीतील दलित आणि मागासवर्गीय दिंड्यांवर होत असलेल्या अन्यायाकडे प्रशासनाचे तीव्र लक्ष वेधले आहे. वरिष्ठ अधिकारी सोहळ्याच्या तयारीसाठी तत्पर असताना, खालच्या स्तरावरील अधिकारी मात्र वरिष्ठांची दिशाभूल करत असून, वारीमध्ये जाणीवपूर्वक भेदभाव केला जात असल्याचा गंभीर आरोप डॉ. बाबा कांबळे यांनी केला आहे.

प्रशासनाच्या दुटप्पी धोरणामुळे वारकऱ्यांची गैरसोय..
डॉ. बाबा कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदीतील समस्त हरिभक्त वैष्णव समाज धर्मशाळेत स्वातंत्र्यापूर्वीपासून असलेल्या वास्तूची दुरुस्ती करण्याचे काम हाती घेतले असता, आळंदी नगर परिषदेने हे काम विनाकारण थांबवले आहे. वारंवार परवानगी मागूनही प्रशासन सहकार्य करत नाही, परिणामी पावसाळ्यात पत्रे गळत असल्याने वारकऱ्यांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. हा भेदभाव वारकऱ्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणारा असल्याचे डॉ. बाबा कांबळे यांनी म्हटले आहे.

जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न; सत्याग्रहाची घोषणा..
पालखी सोहळ्यात संत रोहिदास महाराज दिंडी क्रमांक २४ ला मानाचे स्थान मिळाले असले, तरी आजही खालच्या पातळीवर जातीय भेदभाव केला जात आहे. समाजात फूट पाडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या विघातक प्रवृत्तींना पोलीस प्रशासनाकडून अभय मिळत आहे का, असा सवाल डॉ. बाबा कांबळे यांनी उपस्थित केला आहे. या सर्व बाबींबाबत वारंवार वरिष्ठ अधिकारी आणि मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी करूनही कोणतीही दखल घेतली जात नाही. त्यामुळे, आता अन्यायकारक परिस्थितीच्या विरोधात आपल्याला सत्याग्रहाचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याचे डॉ. बाबा कांबळे यांनी स्पष्ट केले.
८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता ‘संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सत्याग्रह’ आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

पोलीस आयुक्तांना पाहणीचे निमंत्रण..
पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी नुकतीच पालखी मार्गाची पाहणी केली आहे. मात्र, त्यांनी आता दलित दिंड्यांची प्रत्यक्ष परिस्थिती आणि त्यांना सोसाव्या लागणाऱ्या गैरसोयी पाहण्यासाठी आवर्जून वेळ द्यावा आणि दलित दिंड्यांच्या संस्थांना भेट द्यावी, असे जाहीर निमंत्रण डॉ. बाबा कांबळे यांनी दिले आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून हा भेदभाव थांबवावा आणि पालखी सोहळा सर्वांसाठी सन्मानाने पार पडेल, याची दक्षता घ्यावी, अन्यथा ८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी पाच वाजता तीव्र सत्याग्रह आंदोलन करण्यात येईल, असा अंतिम इशाराही डॉ. बाबा कांबळे यांनी दिला आहे.




















Join Our Whatsapp Group