पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड येथील मोहननगर परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणावर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी चिंचवड पोलिसांनी आदित्य गायकवाड (वय १९ वर्षे, काळभोर नगर चिंचवड) याला अटक केली असून एका विधीसंघर्षग्रस्त बालकाचा सहभाग असल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ जुलै रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास सह्याद्री इंडस्ट्रीजसमोर, सेंट अँड्र्यूज स्कूलजवळ ही घटना घडली. फिर्यादी शंकर कृष्णा कापल हे आपल्या मित्रासोबत रस्त्याच्या कडेला उभे असताना आरोपींनी त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.

यावेळी आरोपींनी फिर्यादीच्या मित्राला शिवीगाळ करत दमदाटी केली. त्यानंतर “तुझ्यात दम असेल तर चाकू काढ” असे म्हणत दोघांमध्ये वाद वाढला. दरम्यान, एका आरोपीने जवळील चाकू काढून फिर्यादीच्या मित्राच्या पाठीवर वार केला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीचाही पाठलाग करून मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच भारतीय हत्यार कायदा आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आदित्य गायकवाड या आरोपीला अटक केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजपूत हे करीत आहेत.




















Join Our Whatsapp Group