प्राधिकरणातील ज्येष्ठ नागरिक संघाचे खासदार श्रीरंग बारणे यांना निवेदन
पिंपरी (Pclive7.com):- प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांना विविध प्रलंबित प्रश्नांबाबत निवेदन सादर करण्यात आले. कोविडपूर्वी ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे प्रवासात मिळणाऱ्या सवलती पुन्हा सुरू करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करावा, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.

निवेदनात म्हटले आहे की, सन २०२० पूर्वी ज्येष्ठ नागरिकांना रेल्वेकडून अनेक सवलती दिल्या जात होत्या. पुरुष प्रवाशांना रेल्वे भाड्यात ५० टक्के सवलत, ५८ वर्षांवरील महिलांना ५० टक्के सवलत तसेच आवश्यक बैठक व्यवस्था उपलब्ध करून दिली जात होती. मात्र कोविड काळापासून या सवलती बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे देशभरातील ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक व प्रवासाशी संबंधित अडचणींचा सामना करावा लागत आहे. या सवलती पुन्हा सुरू करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी संघाने केली.

याशिवाय प्राधिकरण सेक्टर क्रमांक २७ येथील टपाल कार्यालयात ज्येष्ठ नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्याही खासदार बारणे यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या. कार्यालयात कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने ज्येष्ठ नागरिकांना दोन ते तीन तास रांगेत उभे राहावे लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या टपाल कार्यालयात स्टॅम्प विक्री, पार्सल सेवा, रजिस्टर पोस्ट, स्पीड पोस्ट, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, मासिक बचत योजना, राष्ट्रीय बचत योजना, सुकन्या समृद्धी योजना आदी विविध सेवा उपलब्ध आहेत. मात्र या सर्व सेवांसाठी केवळ तीनच खिडक्यांवर कामकाज सुरू असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. एजंटसाठी स्वतंत्र खिडकी असली तरी कर्मचारी रजेवर असल्यास कामकाजात विलंब होऊन रांगा अधिक वाढतात, अशी तक्रार करण्यात आली.

प्राधिकरण परिसरातील वाढती लोकसंख्या आणि ज्येष्ठ नागरिकांची संख्या लक्षात घेता टपाल कार्यालयातील कर्मचारी व सेवा खिडक्यांची संख्या वाढविण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर जोशी, माजी महापौर आर. एस. कुमार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत मुथियान, संपादक आशा नष्टे तसेच समिती सदस्य मनोहर जोशी उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group