पिंपरी (Pclive7.com):- स्मार्ट सिटीत समावेश झालेल्या पिंपळे सौदागर प्रभागात सध्या पाणी प्रश्न मोठा गंभीर झाला आहे. वारंवार पाठपुरावा करून पाण्याच्या टाक्या मंजूर करून घेतल्यात, परंतू त्यांचे काम ठप्प असल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने हा प्रश्न सोडवावा अशी मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक नाना काटे आणि नगरसेविका शितल काटे यांनी पिंपरी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग क्र.२८ पिंपळे सौदागर येथील लोकसंख्येचा विचार करता सध्या गावठाणातील एकाच पाण्याच्या टाकीवरून पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे येथील नागरिकांना पाणी योग्य प्रमाणात मिळत नाही. रहाटणी-पिंपळे सौदागर हा प्रभागाचा ‘स्मार्ट सिटी’ योजनेत समावेश झाला आहे. तरीही पाण्याचे योग्य नियोजन होत नाही. आम्ही अनेक वर्षापासून नवीन पाण्याच्या टाकीची मागणी करीत होतो. त्यानुसार वर्षभरापूर्वी पिंपळे सौदागरसाठी दोन पाण्याच्या टाक्या मंजूर केल्यात. निविदा काढल्या, सर्व साहित्य आले, परंतु काम शून्य प्रगतीपथावर आहे. यात काही कुणाचा स्वार्थ लपलाय का..? असा सवाल नाना काटे यांनी उपस्थित केलायं.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, पिंपळे सौदागर मधील पाण्याची समस्या पाहता वेळोवेळी पाठपुरावा करून अमृत योजनेतून पाण्याची टाकी रोझलँड सोसायटी शेजारील नव्याने विकसित होत असलेल्या राजमाता जिजाऊ उद्यान मधील जागेत ६ महिन्यापूर्वी मंजूर करून घेतली आहे. प्रत्यक्षात जागेवर टाकीचे सर्व साहित्य येवून पडले आहेत, तरी अद्याप काम चालू झालेले नाही. यात काही कुणाचा स्वार्थ लपलेला आहे का? तरी संबंधित पाणीपुरवठा अधिकारी रामदास तांबे यांच्याकडे लेखी व तोंडी तक्रार करून सुद्धा ते या तक्रारीकडे दुर्लक्ष करीत आहेत. तरी रामदास तांबे यांची बदली करून त्यांच्या जागी नवीन सक्षम अधिकारी नेमण्यात यावा. सध्या पिंपळे सौदागर येथील नागरिकांना पाणीपुरवठा योग्य प्रमाणात होत नाही. पाण्याची समस्या गंभीर झालेली आहे. येथील पाण्याची समस्या कायमची सुटेल अशी योजना करावी. याप्रकरणी आयुक्तांनी वैयक्तिक लक्ष घालून महापालिकेने मंजूर केलेल्या या दोन पाण्याच्या टाक्यांचे बांधकाम सुरु करण्याचे आदेश देवून टाकीचे काम लवकरात लवकर पूर्ण करून येथील नागरिकांना दिलास द्यावा अशी मागणी नगरसेवक नाना काटे आणि शितल काटे यांनी केली आहे.






















Join Our Whatsapp Group