पिंपरी (Pclive7.com):- टाळगाव चिखलीतील संतपीठाची मूळ संकल्पना आमची आहे. संतपीठ उभारणीसाठी अजित पवारांच्या माध्यमातून शैक्षणिक आरक्षणाची काही जागाही आम्ही ताब्यात घेतली. सत्ताधारी भाजपच्या काळात संतपीठ उभारणीच्या निविदा प्रक्रियेत ‘रिंग’ झाली असून राजकारण करून ‘रिंग’ दडपण्यात येत आहे. परंतू, संतपीठाच्या ‘रिंग’ची आॅडिओ क्लिप महासभेत वाजविणार असल्याचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. यावेळी राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, सुलक्षणा शिलवंत-धर उपस्थित होत्या.
दत्ता साने म्हणाले की, भागवत धर्माचा प्रसार आणि प्रचार व्हावा, वारकरी सांप्रदयाचे पारंपरिक शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे, याकरिता जागतिक दर्जाचे संतपीठ टाळगाव चिखलीत उभारण्यास राष्ट्रवादीच्या कार्यकाळापासून आम्ही पाठपुरावा करुन काही जागा ताब्यात घेतली. अद्यापही उर्वरीत एक हेक्टर जागा ताब्यात घेतलेली नाही. सत्ताधारी भाजप संतपीठाच्या निविदा प्रक्रियेत रिंग केलेली आहे. सदरील रिंग दडपण्यासाठी काही मंडळी श्रेयाचे राजकारण करु लागली आहे.
संतपीठाच्या विषयात आम्ही राजकारण करणार नाही. कारण, गावक-यांच्या मागणीनुसार त्यांची संकल्पना आम्ही मांडली होती. त्यामुळे संतपीठाचे श्रेय कोणी घेवू नये, त्यात राजकारणही करु नये. तसेच संतपीठाच्या एसव्हीपी कंपनीत महापालिकेचे सर्व पदाधिकारी व स्थानिक वारकरी साप्रंदाय ज्येष्ठांचा समावेश करणे आवश्यक आहे. त्या समितीत केवळ प्रशासकीय लोकांचा सहभाग करुन प्रशासन राज आणण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही असे साने म्हणाले.