पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निगडी चौकातील जगद्गुरू संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भक्ती व शक्ती समूह शिल्पावर आधारित ‘लाईट शो’ तयार करण्यात येणार आहे. हे काम प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई करणार आहेत. त्यासाठी त्यांनी व त्यांच्या पथकाने या उद्यानास गुरुवारी (दि.३) भेट देऊन पाहणी केली.
महापालिकेने उभारलेले हे समूह शिल्प राज्यासह देशभरात प्रसिद्ध आहे. या ठिकाणी रोटरी, उड्डाणपूल व ग्रेडसेरपरेटचे काम सुरू आहे. तसेच या चौकातच भविष्यात मेट्रो, बीआरटीएस, एसटी, रिक्षा आदींसाठी ‘मल्टिमोर्डल ट्रान्स्पोर्ट हॅब’ होणार आहे. त्या दृष्टीने नियोजन करून भक्ती-शक्ती उद्यानात ‘लाईट शो’ तयार केला जाणार आहे. तेथील जागा, गर्दी, आराखडा, प्रेक्षक गर्दी, वाहतूक रहदारी आदींची देसाई यांनी पाहणी केली. या वेळी पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, विद्युत विभागाचे सहशहर अभियंता प्रवीण तुपे, कार्यकारी अभियंता ज्ञानदेव झुंजारे, कार्यकारी अभियंता एकनाथ पाटील, बीआरटीचे प्रवक्ते विजय भोजने, स्तुप कन्सल्टंट व ठेकेदार बी. जी. शिर्के यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
भविष्यातातील उड्डाणपूल व ‘मल्टिमोर्डल ट्रान्स्पोर्ट हब’चा आराखडा तयार करून त्याप्रमाणे नियोजन करण्याच्या सूचना आयुक्त हर्डीकर यांनी पालिकेच्या परिवहन कक्षास दिल्या. तसेच उड्डाणपूल व ग्रेडसेपरेटरची रंगसंगती याबाबतची चर्चा झाली. ‘लाईट शो’ला साजेशी रंगसंगती परिसरात केली जाणार आहे. या कामाबाबत आणखी २ ते ३ वेळा परिसराची पाहणी केली जाणार आहे. हा लाईट शो १५ ते २० मिनिटांचा असणार आहे. त्या दृष्टीने नियोजन असून, या प्रकल्पास लाखो रुपये खर्च येण्याची शक्यता आहे. मात्र, त्यामुळे शहरात पर्यटन वाढून नावलौकिकात भर पडणार आहे, असे अधिकार्यांनी सांगितले.