पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरातील स्पाईन रोडलगत असलेल्या भीमशक्तीनगर परिसरात विद्युत तारा धोकादायकरित्या खाली लोंबकळत असल्याने नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते तथा सामाजिक कार्यकर्ते मारुती जाधव यांनी महावितरणच्या भोसरी विभागाचे कार्यकारी अभियंता विश्वनाथ लहाने यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करून तातडीने दुरुस्तीची मागणी केली आहे.

मारुती जाधव यांनी निवेदनात म्हटले आहे की, भीमशक्तीनगरमधील दाट लोकवस्तीच्या भागात विद्युत तारा अत्यंत खाली आल्या असून त्या नागरिकांच्या घरांजवळ तसेच रस्त्यालगत धोकादायक स्थितीत आहेत. परिसरात सुमारे दहा हजारांहून अधिक नागरिक वास्तव्यास असून दररोज मोठ्या प्रमाणात पादचारी आणि वाहनांची वर्दळ असते. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, मागील काही वर्षांपासून ही समस्या कायम असून संबंधित विभागाकडून अद्याप प्रभावी उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वादळी वारे आणि मुसळधार पावसामुळे या तारा तुटण्याची शक्यता वाढली असून त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कोणतीही दुर्दैवी घटना घडण्यापूर्वी महावितरण प्रशासनाने तात्काळ पाहणी करून लोंबकळणाऱ्या तारा उंचावाव्यात, आवश्यक दुरुस्ती करावी आणि कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी मारुती जाधव यांनी केली आहे.
नागरिकांच्या जीविताशी संबंधित हा गंभीर प्रश्न असल्याने महावितरण प्रशासनाने तातडीने दखल घेऊन कारवाई करावी, अशी जोरदार मागणी भीमशक्तीनगर परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.




















Join Our Whatsapp Group