पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहर आणि पुणे ग्रामीण परिसरातील अवैध दारू व्यवसायाचे संपूर्ण उच्चाटन करण्यासाठी पोलिस व राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्तपणे कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात महत्त्वपूर्ण समन्वय बैठक आयोजित करण्यात आली.

पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत पोलिस तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. अवैध हातभट्टी दारू, बनावट मद्यनिर्मिती, दारू गाळणी केंद्रे आणि अवैध विक्री साखळी यांच्यावर प्रभावी कारवाई करण्यासाठी व्यापक चर्चा करण्यात आली.
बैठकीत अवैध दारू व्यवसायाशी संबंधित माहितीची देवाणघेवाण अधिक वेगाने आणि प्रभावीपणे करण्यावर भर देण्यात आला. तसेच संयुक्त छापेमारी, गुप्त माहिती संकलन, संशयितांवर लक्ष ठेवणे आणि कारवाईची अंमलबजावणी अधिक मजबूत करण्याबाबत निर्णय घेण्यात आले.

विषारी दारू प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू निर्मिती व विक्री रोखण्यासाठी पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्यातील समन्वय अधिक बळकट करण्यात येणार असून, संबंधितांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. या बैठकीस पोलिस विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अवैध दारूचे संपूर्ण उच्चाटन करून नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करणे हेच या संयुक्त मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.




















Join Our Whatsapp Group