पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे गुरवमध्ये दोन दिवसांपूर्वी मंदीराचा सभामंडप कोसळून ३ मजूरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेला पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्तच जबाबदार असल्याचा आरोप करत या अपघातातील दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत केली.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर राहुल जाधव होते. दोन दिवसांपूर्वी पिंपळेगुरवमध्ये मंदीराचे बांधकाम सुरू असताना सभामंडप कोसळून तीन मजूरांचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेचे पडसाद आजच्या महासभेत चांगलेच उमटले.
सभेच्या सुरूवातीलाच विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी या घटनेकडे लक्ष वेधले. ते म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहरात अनधिकृत बांधकामांचा प्रश्न मोठा गंभीर झालायं. एखादा नागरिक अवैध बांधकाम करत असेल तर पालिकेचे अधिकारी तात्काळ त्या बांधकामावर बुलडोजर फिरवला जातो. मात्र पिंपळेगुरवमध्ये या मंदीराचे काम बेकायदेशीरपणे सुरू होते. पालिकेने १३ नोव्हेंबर १८ रोजी तशी नोटीसही बजावली होती. तरी देखील हे काम कसे सुरू होते. पालिकेचे अधिकारी झोपले होते का? ही घटना घडल्यानंतर आपल्या अधिकाऱ्यांनी त्या मंदीरावर कारवाई केली. आयुक्तांनी कोणाच्याही दबावाखाली काम करू नये. या दुर्घटनेला महापालिकेचे आयुक्तच जबाबदार आहेत. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने दत्ता साने यांनी केली.
शिवसेना गटनेते राहुल कलाटे म्हणाले की, या घटनेमुळे प्रशासनाच्या भूमिकेवर संशय निर्माण होत आहे. याप्रकरणाची सर्व प्रकारे चौकशी झाली पाहिजे. सामान्य नागरिकाने एखादे शेड उभारले तर ते पाडले जाते. मंदीराला आमचा विरोध नाही. परंतू कोणतीही परवानगी नसताना या मंदीराचे काम कसे सुरू होते. आयुक्तांनी आता या प्रकरणासाठी चौकशी कमिटी नेमली आहे. या कमिटीने सर्व कायदेशीर गोष्टी तपासून घेऊन दोषींवर कारवाई केली गेली पाहिजे.
मनसे गटनेते सचिन चिखले म्हणाले की, झालेली घटना दुर्दैवी आहे. शहरात पुन्हा अशी घटना घडू नये म्हणून प्रशासनाने आता ठोस भूमिका घेतली पाहिजे. शहरातील सर्व मंदीरांचा सर्व्हे पालिकेने केला पाहिजे.
राष्ट्रवादीचे नगरसेवक अजित गव्हाणे म्हणाले की, पिंपळे गुरवमध्ये घडलेल्या या घटनेचे आम्ही राजकारण करत नाही. परंतू अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून योग्य ती पाऊले उचलली पाहिजे. आयुक्तांनी शहरातील सर्व मंदीरांची पाहणी केली पाहिजे. मंदीरांच्या बांधकामाकरीता नियम अटी किचकट असल्यामुळे बेकायदेशीर कामे केली जातात. त्यात बदल केला तर कोणी बेकायदेशीर काम करणार नाही.
भाजपाचे नगरसेवक शशिकांत कदम यांनी विरोधकांनी केलेल्या आरोपांचे खंडण केले. ते म्हणाले की, पिंपळेगुरवमध्ये अनेक मंदीर आहेत. दुर्घटना घडलेले मंदीर रस्त्यात येत होते. त्यामुळेच त्या मंदीराचा जिर्णोध्दार करण्याचा निर्णय पिंपळेगुरवमधील ग्रामस्थांनी घेतला होता. गावकऱ्यांनी वर्गणी काढून या मंदीराचे काम सुरू केले होते. या मंदीराशी आम्हा ग्रामस्थांच्या भावना जोडल्या गेल्यात, त्यामुळे यात कोणी राजकारण करू नये.
सत्तारूढ पक्षनेता एकनाथ पवार म्हणाले की, पिंपळे गुरव म्हटलं की एकही संधी सोडायची नाही, अशी विरोधकांची कायम भूमिका असते. त्यांच्या या भूमिकेची किव वाटते. दुर्दैवी घटना घडली असताना त्यात राजकारण केले जातयं.
महापौर राहुल जाधव म्हणाले की, पिंपळे गुरवमधील घटना दुर्दैवी आहे. अशा प्रकारे मंदीरांची कामे करायची असतील तर पालिकेची परवानगी घेतली गेली पाहिजे. बांधकाम परवानगीत शितीलता आणली गेली पाहिजे. तातडीने बैठक घेऊन निर्णय घेण्याच्या सुचना महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.






















Join Our Whatsapp Group