– संदेश पुजारी –
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी भोसरी विधानसभेच्या आखाड्यात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. “प्रारंभ नव्या युगाचा.. नव्या पर्वाचा..” अशी टॅग लाईन वापरून सोशल मिडीयावरून एकनाथ पवार यांनी आपले ‘इरादे’ स्पष्ट केलेत. गेल्या विधानसभेतही त्यांनी भाजपाची उमेदवारी मिळवून लक्षवेधी लढत दिली होती. दिल्ली दरबारातील दिग्गजांशी एकनाथ पवार यांची असलेली जवळीक यामुळे यावेळीही ते भाजपाची उमेदवारी मिळवतील असा विश्वास त्यांच्या समर्थकांना आहे. दरम्यान, सुरू असलेल्या या सर्व प्रकारामुळे भोसरी विधानसभेचे भाजपाचे सहयोगी आमदार महेश लांडगे यांची डोकेदुखी मात्र वाढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
पिंपरी चिंचवड शहर भाजपातील जुने, निष्ठावंत म्हणून एकनाथ पवार यांना ओळखले जाते. शहराध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशी महत्वाची पदे त्यांनी यापूर्वी भूषवली आहेत. सध्या महापालिकेतील सत्तारूढ पक्षनेते पदाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे ते कट्टर समर्थक म्हणून सर्वांना परिचीत आहेत. तर केंद्रीय मंत्री असलेल्या स्मृती इराणी यांच्याशी देखील पवार यांचे जवळचे संबंध असल्याचे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दिसून आले. स्मृती इराणी यांच्या प्रचार यंत्रणेत एकनाथ पवार सहभागी झाले होते. तर मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पवार यांनी नुकतीच स्मृती इराणी यांची घेतलेली भेट स्थानिक नेत्यांना बुचकळ्यात टाकणारी होती. एकंदरीत परिस्थिती पाहता शहर पातळीवर एकनाथ पवार यांना म्हणावी तेवढी ताकद निर्माण करता आली नसली तरी ‘दिल्ली दरबारी’ त्यांनी स्वत:ला विशेष महत्व प्राप्त करून घेतले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने एकनाथ पवार त्यांच्यावर विश्वास टाकला होता. भोसरी विधानसभेतून भाजपच्या तिकीटावर ते निवडणुक लढले होते. त्यावेळी लक्षवेधी मतदान त्यांना झाले होते. अपक्ष निवडणुक लढलेले महेश लांडगे यांनी त्यावेळी बाजी मारली होती. त्यानंतर आमदार लांडगेंनी भाजपाचे सहयोगी सदस्यत्व स्विकारले होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले. त्यानंतर राज्य पातळीवर निष्ठावंतांना संधी देण्याची रणनिती सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर एकनाथ पवार यांना पुन्हा भोसरी विधानसभेची उमेदवारी मिळू शकते. दरम्यान, एकनाथ पवार यांनी भाजपातील जुन्या निष्ठावंतांची जुळवाजुळव करून खिंड लढविण्याची तयारी सुरू केलीयं. दिल्ली दरबारातील संबंधामुळे एकनाथ पवार यांनी विधानसभा लढविण्याची तयारी सुरू केलीय. त्यामुळे येत्या काळात विद्यमान आमदार महेश लांडगे यांची डोकेदुखी वाढणार असून भोसरीच्या आखाडा बहुचर्चित ठरणार एवढं मात्र नक्की..!