पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील अवैध बांधकामावरील शास्तीकर बाधितांनी महापालिकेच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. शास्तीकराच्या विरोधात आज महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. महापालिका मुख्यालयासमोर निदर्शने करून नोटीसांची होळी करण्यात आली. त्यानंतर शिष्ठमंडळाकडून आयुक्तांना निवदेन देण्यात आले. सरसकट शास्तीकर माफ व्हावा. अनियमित बांधकामे नियमित व्हावीत. रिंगरोड रद्द व्हावा. रेडझोन हद्द कमी करण्यात यावी. लवकरात लवकर या प्रमुख मागण्यासाठी पूर्ण न झाल्यास पुढची धडक मंत्रालयावर असणार आहे, असा इशारा यावेळी कृती समितीच्यावतीने देण्यात आला.

आकुर्डीतील खंडोबा माळ देवस्थानापासून सकाळी ११ वाजता मोर्चाला सुरुवात झाली. काळभोरनगर, चिंचवड, मोरवाडीमार्गे हा मोर्चा महापालिकेवर येऊन धडकला. महापालिका मुख्यालयासमोर शास्तीविरोधी कृती समितीच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी शास्तीच्या नोटीसांची होळी केली गेली.
या मोर्चात माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नाना काटे, मयुर कलाटे, शाम लांडे, विक्रांत लांडे, प्रविण भालेकर, राजू मिसाळ, पंकज भालेकर, मोरेश्वर भोंडवे, जावेद शेख, अपक्ष नगरसेवक नवनाथ जगताप, नगरसेविका वैशाली घोडेकर, अपर्णा डोके, संगीता ताम्हाणे, वैशाली काळभोर, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, शिक्षण मंडळाचे माजी सभापती धनंजय भालेकर, माजी नगरसेवक चंद्रकांत वाळके, शेखर ओव्हाळ तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

विलास लांडे म्हणाले की, शास्तीकर, रिंगरोड, शेतकऱ्यांचा साडेबारा टक्के परतावा, रेडझोन प्रश्न, अनधिकृत बांधकाम नियमितीकरण अशा अनेक प्रश्नासंदर्भात हा मोर्चा काढण्यात आला आहे. सर्व पक्षांनी जनतेला पाठींबा दिला आहे. विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत. आता सत्ताधारी तुम्हाला खोट्या आश्वासनाचे गाजर देतील. परंतू नंतर कारवाईची टांगती तलवार तुमच्या डोक्यावर कायम राहणार आहे. म्हणून सत्ताधाऱ्यांना आताच वटणीवर आणण्याची गरज आहे. या प्रश्नासाठी लोकांनी एकजुट ठेवली पाहिजे. प्रश्न सुटत नाही तोपर्यंत लढा चालू ठेवला पाहिजे.
संजोग वाघेरे पाटील म्हणाले की, २०१४ ची निवडणुक झाली, नुकतीच लोकसभा ही झाली.आता तोंडावर विधानसभा निवडणुक आली आहे. परंतू भाजपच्या मंडळींकडून पुन्हा आश्वासनांचे गाजर देण्यात येत आहे. लघु उद्योजकांना कारवाईच्या नोटीसी देण्यात येत आहेत. शंभर दिवसात शास्तीचा प्रश्न सोडवू असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. १०० दिवस कधीच संपले, आता सत्तेची पाच वर्षे झाली, तरी या सरकारला जाग येत नाही. भविष्यात मंत्रालयावर धडक मोर्चा काढावा लागला तरी चालेल. कारवाईची टांगती तलवार संपली पाहिजे. राष्ट्रवादी जनतेसोबत सदैव राहणार आहे.
सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर म्हणाले की, गेल्या अनेक वर्षापासून सरसकट शास्तीकर माफीसाठी आम्ही जनआंदोलन करत आहोत. पूर्वी शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी देखील आमच्या आंदोलनात सहभाग नोंदविला होता. सत्तेत आल्यावर शंभर दिवसात शास्तीचा प्रश्न सोडवू असे आश्वासन दिले. आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, गौतम चाबुकस्वार आता सत्तेत येऊन पाच वर्षे झाली. परंतू यांना हा प्रश्न सोडवता आला नाही. जोपर्यंत सरसकट शास्तीकर माफ होत नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच ठेवणार आहे.
सचिन चिखले म्हणाले की, जोपर्यंत सरसकट शास्तीकर माफ होत नाही तोपर्यंत हा लढा चालू ठेवणार आहोत. वेळप्रसंगी मुंबईला मंत्रालयावर देखील धडक मोर्चा काढू.
लघुउद्योजक संघटनेचे संदीप बेलसरे म्हणाले की, भर पाऊसातही नागरीक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले आहेत. पिंपरी चिंचवडच्या विकासात लघुउद्योजकांचा मोठा हातभार आहे. मात्र मोठ्या रक्कमेचा शास्तीकर देऊन लघु उद्योजकांचे कंबरडे मोडण्याचा प्रयत्न केला जातोय. सत्ताधाऱ्यांनी लवकरात लवकर प्रश्न सोडविला नाही तर आमच्या रौद्र रूपाच्या आंदोलनाला सामोरे जावे लागेल.
दत्ता साने म्हणाले, नागरी कृती समितीच्या माध्यमातून हा मोर्चा काढला गेलायं. भाजपाने जे आश्वासनाचे गाजर आजवर दिलयं, त्या विरोधात हा मोर्चा आहे. भाजपाचे कुंभकर्ण सरकार झोपलेले आहे. त्यांना जागे करण्यासाठी हा मोर्चा आहे. जनतेच्या मतांवर हे खासदार, आमदार झालेत. औद्योगिक नगरीचा कणा उध्द्वस्त करण्याचा उद्योग सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे. कोणीही शास्तीकर भरू नये, कारवाईला कोणी आले तर बिनधास्त ठोका. सत्ताधाऱ्यांचे डोके ठिकाणावर आले नाही, तर मंत्रालयावर धडक मोर्चा काढणार आहोत. भोसरीच्या आमदाराला निवडणुका आल्या की, शास्ती कर, रेडझान दिसतो. शास्तीकर प्रश्न सुटत नाही तोपर्यंत मिळकत कर भरू नका. शास्तीकरातून माध्यमातून नागरिकांना दरवर्षी फाशी दिली जात आहे. जोपर्यंत सरसकट शास्तीकर माफ होत नाही तोपर्यंत हे जनआंदोलन थांबणार नाही.






















Join Our Whatsapp Group