पिंपरी (Pclive7.com):- भोसरी विधानसभा मतदार संघात भाजपचे उमेदवार पैलवान आमदार महेश लांडगे ७७ हजार ५६७ मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार विलास लांडे यांचा मोठ्या मताधिक्क्याने पराभव केला आहे.
भोसरी मतदार संघात भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे व राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार माजी आमदार विलास लांडे यांच्यात दुरंगी लढत झाली. त्यांच्यासह १२ उमेदवार रिंगणात होते. या मतदार संघात ५९ टक्के मतदान झाले होते. एकूण २ लाख ६३ हजार ३६३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
याठिकाणी २० टेबलांवर मतमोजणी झाली. मतमोजणीच्या २१ फेर्या पार पडल्या. पहिल्या फेरीपासूनच लांडगेंची आघाडी घेतली असून त्यांच्या मतांच्या जवळपास पोहचताना लांडे यांची चांगलीच दमछाक झाली. प्रत्येक फेरीअखेर लांडे हे लांडगेंच्या तुलनेत निम्म्या मताने मागे असल्याचे पहायला मिळाले. लांडगेंची सततची आघाडी पाहून सातव्या फेरीअखेरच त्यांच्या समर्थकांनी भंडार्याची उधळण सुरु केली आहे. विलास लांडे यांच्या कार्यकर्त्यांनी बालेवाडीतील मतमोजणी केंद्रातून हळूहळू काढता पाय घेतला.