पिंपरी (Pclive7.com):- भारतीय जनता पार्टीचे माजी मंत्री राम शिंदे हे नुकतेच पिंपरी चिंचवड शहरात आले असताना काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुलजी गांधी यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी टिका केली. याचा पिंपरी चिंचवड शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने पत्रक काढून जाहीर निषेध करण्यात आला. राहुलजींच्या आजवरच्या वाटचालींने व कर्तृत्वाने त्यांनी संपूर्ण विश्वाला दाखवून दिले आहे कि त्यांचे रक्तात देशभक्त आहे व त्यांची ‘ब्रीड’ ही त्याग, बलिदान,समर्पण व सेवाभावाचीच आहे असे प्रतिउत्तर पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसचे अध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी दिले आहे.
बनसोडे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निषेध पत्रात म्हटले आहे की, राम शिंदे यांनी टीका करताना राहुल गांधींच्या जन्माचा मुद्दा मांडला व त्यांनी राहुल गांधींना भारतीय संस्कृती माहीत नाही ते हायब्रीड व्हर्जन आहेत. तसेच ते इंडो- ईटालियन व्हर्जन आहेत अशी टीका केली. सावरकरांबद्दलच्या राहुल गांधींच्या वक्तव्या विरोधी शिंदे यांना टिका करावयाची होती तर ती वास्तविक मुद्यांच्या आधारे करणे योग्य ठरले असते. मात्र शिंदे यांनी तसे न करता थेट खालीच पातळी गाठत आपल्या अकलेचे तारे तोडल्याचे वरिल वक्तव्यावरून दिसून आले आहे.
विचारांना-विचारांनी उत्तर देण्याची क्षमता नसणारे लोक असे वैयक्तिक स्वरूपाच्या टिका टिप्पणी करतात. व मूळ मुद्यावरून दिशाभूल करतात. हाच भाजपाचा खरा चेहरा पुन्हा एकदा जनतेच्या समोर आला आहे. राहुल गांधी हे राजीवजींचे म्हणजेच एका शहीदाचे पुत्र आहेत. देशासाठी प्राण द्यावे लागलेल्या आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते दिवस रात्र झटत आहेत. देशभर फिरून ते देशातील एकात्मतेसाठी लढत आहेत. अन्यायविरोधी आंदोलने करत आहेत. शेतकरी, गोरगरीब, पिडीत, शोषित, दिन, दुर्बल या सर्वांचे अश्रू पुसण्याचे काम करणाऱ्याला या देशाची संस्कृती माहीत नसेल का? माणुस जन्माने नाही तर कर्माने मोठा होतो. हि साधी बाब शिंदे यांना माहीत नसावी, याची किव येते. केवळ प्रसिध्दीसाठी बड्या व्यक्ती वर टिका करणे हे शिंदेंच्या मनोवृत्तीचे दर्शन घडवते.
आजवरच्या वाटचालींने व कर्तृत्वाने राहुलजींनीं संपूर्ण विश्वाला दाखवून दिले आहे कि त्यांचे रक्त हे देशभक्त व त्यांची ब्रीड ही त्याग, बलिदान,समर्पण व सेवाभावाचीच आहे. राम शिंदे हे पराभूत झाल्याने व एकंदरीतच त्यांचे राजकारण संपुष्ठात आल्याने ते नैराश्यात आहेत. त्यातूनच असे प्रसिद्धीचे प्रयत्न ते करत असावेत. जनहीताची कामे मतदारसंघात करणे त्यांना जमले नसल्याने जनतेने त्यांना घरचा रस्ता दाखविला आहे. याबाबतचे प्रथम आत्मपरीक्षण करावे असा खोचक सल्ला ही युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे. या पत्रावर पिंपरी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष हिराचंद जाधव, भोसरी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष नासीर चौधरी, चिंचवड विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष सौरभ शिंदे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.