पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असताना एका ४२ वर्षीय पुरुष रुग्णाचा आज (रविवारी) मृत्यू झाला. गेल्या तीन दिवसांपासून हा रुग्ण अत्यवस्थ होता. तर आज आणखी दोघांना करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे बाधितांची संख्या ३१ वर पोहोचली असून, वाढत्या रुग्णांमुळे पुण्यापाठोपाठ पिंपरी चिंचवड कोरोनाचे नवे ‘हब’ बनू लागले आहे.
गेल्या चार दिवसांपासून शहरात सातत्याने नवे रुग्ण सापडत असल्याने शहरात दहशतीचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच आज कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्याने भीतीमध्ये वाढच झाली आहे. प्रशासन कसोसीने प्रयत्न करत असले तरी वाढत्या रुग्णांची संख्या रोखण्यात अद्याप प्रशासनाला यश आलेले नाही. आज (रविवारी) बाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर दोघांना नव्याने कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शहरातील बाधितांची संख्या ३१ वर पोहोचली असून, त्यापैकी १२ जण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर एकाचा मृत्यू झाला. सध्या महापालिकेच्या ‘वायसीएम’ रुग्णालयात १५ तर पुण्यातील रुग्णालयात तिघांवर उपचार सुरू आहेत. महापालिकेच्या वतीने आतापर्यंत ८२२ व्यक्तींच्या घशातील द्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी ७३० व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले असून, ३१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. उर्वरित नमुने येणे अद्याप बाकी आहेत.
एकाच दिवसात ६५ नवे संशयित
महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात आज एकाच दिवसात ६५ नव्या संशयितांना दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील नमुने तपासण्यासाठी पाठविण्यात आले असून, आज दिवसभरात 27 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अद्यापही 65 जणांचे अहवाल येणे बाकी असल्याने बाधितांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
.






















Join Our Whatsapp Group