नवी दिल्ली (Pclive7.com):- कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव आणि अनेक राज्यांनी लॉकडाउन कायम ठेवण्याची मागणी या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय निर्णय घेणार हे मंगळवारी सकाळी १० वाजता स्पष्ट होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील करोनाची स्थिती आटोक्यात आणण्यासाठी जाहीर केलेला २१ दिवसांचा लॉकडाउन १४ तारखेला संपत आहे. त्याच दिवशी सकाळी १० वाजता पंतप्रधान मोदी देशाला संबोधित करणार आहेत. त्यामुळे ते पुढील निर्णय काय घेतात याकडे देशाचे लक्ष लागले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी (११ एप्रिल रोजी) देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेतली होती. त्यानंतर राज्यातील लॉकडानचा कालावधी ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. आता पंतप्रधान नरेंद्र मोदीही देशव्यापी लॉकडाउनचा कालावधी वाढवण्यासंदर्भात काही घोषणा करतात का याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागून राहिलेले आहे. शनिवारी मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक झाल्यानंतर मोदी देशातील जनतेला संबोधित करतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र ‘मोदी आज देशवासियांशी संवाद साधणार नाहीत,’ अशी माहिती भारत सरकारनेच जारी केली होती. त्यामुळेच त्या बैठकीनंतर दोन दिवसांमध्ये झालेल्या चर्चेनंतर घेण्यात आलेल्या लॉकडाउनसंदर्भातील महत्वाच्या निर्णयांची घोषणा पंतप्रधान करतील असं सांगितलं जात आहे.
देशामध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. १३ एप्रिल रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत देशामधील करोनाग्रस्तांची संख्या सात हजार ९८७ इतकी होती. तर करोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या ३०८ इतकी होती. देशातील काही राज्यांमध्ये कोरोना झपाट्याने वाढताना दिसत आहेत. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र, तामिळनाडू, तेलंगणा, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, केरळ, मध्य प्रदेश, कर्नाटक, गुजरात या प्रमुख राज्यांचा समावेश आहे. त्यामुळेच यापैकी बहुतांश राज्यामधील सरकारने लॉकडाउनचा कालावधी आधीच वाढवला आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारही देशभरातील लॉकडाउनचा कालावधी वाढवणार का यासंदर्भात मोदींच्या या भाषणामधूनच समजेल.






















Join Our Whatsapp Group