पिंपरी (Pclive7.com):- दिलासा संस्थेच्या वतीने “नियमित वृत्तपत्रे वाचा.! “वाचाल तर वाचाल” हा अभिनव उपक्रम पिंपळे गुरव- नवी सांगवी परिसरात घेण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या संस्थेचे शहराध्यक्ष आण्णा जोगदंड होते. याप्रसंगी दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक, प्रकाश घोरपडे, अरुण परदेशी, संगीता जोगदंड, वनिता पुजारी, मंदा भारतकर, डॉ. आर डी पाटील, सानिका पाटील, सुयश कदम, चंद्रकांत घाटे, शहाजी ढोरमले, वीणा मेंगरती, प्रमोद राऊत, संजय शितोळे उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे अण्णा जोगदंड म्हणाले की, मोबाईल, इंटरनेटच्या काळात वृत्तपत्र वाचन करणे लुप्त होऊ लागले आहे. फेसबुक, युट्युब, इंस्टाग्रामच्या माध्यमातून अफवा पसरविणाऱ्या अनेक बातम्या दिल्या जातात. याची सत्यता कुठेही बघितली जात नाही तरुणाई मोबाईलच्या विळख्यात सापडलेली आहे, नको असलेल्या गोष्टीही तरुणाई बघत आहे. काही देशात 18 वर्षा खालील मुलांना फेसबुक, युट्युब, इंस्टाग्राम वर बघण्यास बंदी आहे. यावर कोणाचाही अंकुश नसतो कुठलीच सत्यता नसते, याउलट वृत्तपत्रे बातमीची शहानिशा करून सत्यता जाणून समाजमुख बातम्या देतात. वृत्तपत्रांमधून अनेक जाणकार साहित्यिक, विविध विषयातील तज्ञ लिखाण करत असतात. मुलांना वृत्तपत्रे वाचण्याची गोडी लावण्याचे काम पालकांचे आहे. यासाठी घरामध्ये कोणते ना कोणते वृत्तपत्र असलेच पाहिजे.!” असे विचार जोगदंड यांनी मांडले.

दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक म्हणाले “वृत्तपत्रे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. नाममात्र किंमतीमध्ये मिळणारी वृत्तपत्रे छोट्या मुलांना वाचायला दिली तर त्यांच्या ज्ञानात भरच पडेल.!”
दिलासा संस्थेच्या वतीने फेमस चौक नवी सांगवी येथील वृत्तपत्र विक्रेत्या राऊबाई बिराजदार यांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी त्या म्हणाल्या की वृत्तपत्र विकून मी माझ्या दोन्ही मुलांचे शिक्षण आणि मुलीचे लग्न केले आहे. परंतु आता वृत्तपत्रांचा खप कमी झालेला आहे अशी खंत व्यक्त केली. साई चौक नवी सांगवी येथील वृत्तपत्र विक्रेते गौरव मोकाशी, सृष्टी चौक येथील वृत्तपत्र विक्रेत्या मंगल दापकेकर यांचा संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला. तसेच संस्थेच्या कार्यकर्त्यांनी “वृत्तपत्रे वाचा!” हा संदेश देत सृष्टी चौका जवळील घराघरामधून वृत्तपत्रे वाटली. “वाचाल तर वाचाल” नियमित वृत्तपत्रे वाचा हा संदेश यानिमित्त देण्यात आला.
मुरलीधर दळवी यांनी आभार मानले.




















Join Our Whatsapp Group