पिंपरी (Pclive7.com):- कोरोनाच्या काळात डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी देवदूताप्रमाणे रुग्णांची सेवा केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर हात उचलण्याची चूक माझ्या हातून कधीही घडणार नाही. मात्र रविवारी रात्री कोरोनाग्रस्त महिला मृत झाल्यानंतरही वेगवेगळी कारणे देऊन सदर महिलेचा मृतदेह आयसीयूमध्ये ठेवण्याच्या रुग्णालय प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा जाब विचारणे हा गुन्हा आहे का? असा सवाल नगरसेवक संदीप वाघेरे यांनी उपस्थित केला आहे.
यासंदर्भात बोलताना नगरसेवक वाघेरे म्हणाले की, महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात रविवारी पिंपरीगावातील एका वृद्ध महिलेचे वेळेत योग्य उपचार न मिळाल्यामुळे तसेच रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे रात्री निधन झाले. निधन झाल्यानंतरही रुग्णालय प्रशासनाकडून सदर महिलेला आयसीयूमध्ये दाखल करण्याची लगबग सुरू झाली. मात्र सदर महिलेचा मृत्यू झाला असताना त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्याचा प्रकार नेमका कशासाठी सुरू आहे. यासंदर्भात मी डॉक्टर आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणीही यासंदर्भात गांभीर्य दाखविले नाही.
मागील काही महिन्यांपासून मी सातत्याने वायसीएम रुग्णालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या गैरकारभाराविरोधात आवाज उठवीत आहे. या ठिकाणच्या अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणीही मी केली आहे. कोरोना काळातही या ठिकाणी दाखल असलेल्या अनेक रुग्णांच्या वायसीएममधील गैरप्रकारांबद्दल सातत्याने तक्रारी येत होत्या. त्यामुळे मी एक लोकप्रतिनिधी असल्याकारणाने नागरिकांच्या समस्यांसाठी आवाज उठविणे माझे कर्तव्य आहे. परंतु हे कर्तव्य बजावत असताना मी सामाजिक भान जपत असतो.
कोरोना महामारीच्या काळात डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी जी सेवा बजावली आहे. त्याचे मोल नाही. ते खऱ्या अर्थाने देवदूत असून त्यांच्याविषयी माझ्या मनात कमालीचा आदर आहे. त्यामुळे त्यांच्यावर हात उचलण्याचा अथवा त्यांना शिवीगाळ करण्याचा निंदनीय प्रकार माझ्याकडून घडू शकत नाही. मात्र रुग्णालयातील भोंगळ कारभाराविरोधात आवाज उठविल्याने माझ्यावर नाराज असणाऱ्यांनी या प्रकाराला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न चालू केला आहे. घडलेल्या संपूर्ण घटनेचा सुमारे ९ मिनिटांचा व्हिडीओ आपल्याकडे आहे. त्यामुळेया प्रकरणातील सत्य नक्कीच जनतेसमोर येईल, असा विश्वास नगरसेवक संदीप वाघेरे यांनी यावेळी व्यक्त केला आहे.




















Join Our Whatsapp Group