पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी पाच नगरसेवकांचे अर्ज पक्षाकडे दाखल झाले असून चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. यात नगरसेवक अजित गव्हाणे, राजू मिसाळ, विनोद नढे, संतोष कोकणे आणि नगरसेविका वैशाली घोडेकर यांनी पक्षाकडे संधी मागितली आहे. विद्यमान विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांचा पदाचा एक वर्षाचा कालावधी संपुष्टात येत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी विरोधी पक्षनेते पदासाठी पक्षातील इच्छुक नगरसेवकांचे अर्ज मागविले होते.
महापालिकेतील विरोधी पक्षनेते काटे यांचा कार्यकाळ नुकताच संपत असल्यामुळे पक्षाने इच्छुकांचे अर्ज मागवून घेऊन निवड प्रक्रिया राबवावी, असे आदेश राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पक्षाचे अध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांना दिले होते. त्यानुसार सोमवार दि.१० ते बुधवार दि.१२ ऑगस्ट दरम्यान खराळवाडी येथील पक्ष कार्यालयात इच्छुकांचे अर्ज स्वीकारले जाणार होते.
राष्ट्रवादीचे जेष्ठ नगरसेवक अजित गव्हाणे, राजू मिसाळ, विनोद नढे, संतोष कोकणे आणि माजी महापौर नगरसेविका वैशाली घोडेकर या पाच जणांचे अर्ज आले आहेत. दरम्यान विरोधी पक्षनेते निवडीचे सर्व अधिकार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे आहेत. त्यामुळे ते नेमकी कोणाला संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





















Join Our Whatsapp Group