मुंबई (Pclive7.com):- एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी एसटीची बस सेवा सुरू करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे. त्यानुसार उद्यापासून एसटी सुरू होणार आहे. बसमधून प्रवाशांना ई पास तसेच कोणत्याही प्रकारची परवानगी राहणार नाही. गणेशोत्सवाच्या तोंडावरच राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चच्या अखेरीस पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर एसटीची चाकेही थांबली होती. त्यामुळे लोकांची गैरसोय झालीच, शिवाय एसटीला हजारो कोटींचा फटका बसला होता. लॉकडाऊनच्या काळात परप्रांतीय कामगार व मजुरांना राज्याच्या सीमेवर सोडण्यासाठी, राज्याबाहेरील विद्यार्थ्यांना आणण्यासाठी, ऊसतोड कामगारांना घरी पोहोचवण्यासाठी व अत्यावश्यक सेवा देण्यासाठी एसटी धावत होती. आता ती सर्वांसाठीच धावणार आहे. राज्य सरकारने धाडसी निर्णय घेत एसटीची आंतरजिल्हा सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी ही माहिती दिली. ‘उद्यापासून एसटीची साधी, निमआराम, शिवशाही, शिवनेरी या सर्व प्रकारच्या बस सेवा (मूळ तिकीट दरात) टप्याटप्याने सुरू होत असून त्यापैकी लांब आणि मध्यम पल्ल्याच्या बसेस आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. एसटीच्या प्रवासासाठी ई पासची आवश्यकता नसून प्रवासात प्रवाशांनी शासनाने घालून दिलेल्या कोविड – १९ च्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे,’ असे परब म्हणाले.
यापूर्वीही सरकारने एसटीची आंतरजिल्हा बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, लोकांच्या मनात असलेल्या भीतीमुळे त्यास फारसा प्रतिसाद मिळाला नाही. शिवाय, काही जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव अधिक असल्याने तुलनेने कमी प्रभावित जिल्ह्यांतून सरकारच्या या निर्णयाला विरोध झाला होता. त्यामुळे तो निर्णय स्थगित करावा लागला होता. आता पुन्हा एकदा राज्य सरकारने एसटी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.






















Join Our Whatsapp Group